सोलापुरात ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा , 26 टनाची गरज; 20 टन पुरवठा

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा सध्या सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी दररोज 26 टन ऑक्सिजनची आवश्यकता असून, सध्या फक्त 20 टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

जिल्हा प्रशासनाकडे सध्या 4 टन ऑक्सिजन शिल्लक आहे. पुणे जिल्ह्यातून सोलापूरला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा घटला आहे. त्यामुळे सोलापूरकरांची मदार आता हैदराबाद, गुलबर्गा व ईरकल या भागावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक व आंध्र प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याने या भागातून सोलापूरला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होण्याची अपेक्षा आहे.

पुणे जिल्ह्यातून होणारा ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरवठादारांनी ऑक्सिजनचे दर आता दुप्पट केले आहेत. त्यामुळे सोलापुरात सध्या जादा दराने ऑक्सिजन खरेदी करावा लागत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील ऑक्सिजनचे नियंत्रण व नियोजन केले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दाखल होणारा ऑक्सिजन हा फक्त वैद्यकीय कारणास्तव वापरण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

ऑक्सिजनची किंमत दुपटीने वाढली

पुणे जिल्ह्याने क्लिनिंग आणि हँडलिंगच्या नावाखाली ऑक्सिजनचे दर दुप्पट केले आहेत. पूर्वी आम्ही तीनशे रुपये किलो दराने विकणारा ऑक्सिजन आता आम्हाला 600 रुपये किलो दराने विकावा लागत आहे. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना त्यांच्या घरी गेल्यानंतरही ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. नव्याने वाढणारे रुग्ण यामुळे ऑक्सिजनची मागणी जवळपास चारपटीने वाढली असल्याची माहिती श्री महालक्ष्मी एंटरप्रायजेसचे प्रमोद तम्मनवा यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या