अवघ्या 29 जणांनी मंजूर केला अर्थसंकल्प, 73 नगरसेवकांना सोलापूर महापालिकेत प्रवेशच नाही

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 754 कोटींचा अर्थसंकल्प अवघ्या 29 जणांनी मंजूर केला आहे. यात सत्ताधाऱयांना झुकते माप देण्यात आले असून, 73 नगरसेवक या अर्थसंकल्पीय सभेत भाग घेऊ शकले नाहीत.

सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा मंगळवारी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेता शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते व निवडलेले नगरसेवक असे अवघे 29 सदस्य उपस्थित होते. शिवानंद पाटील यांनी आयुक्तांनी सादर केलेल्या 754 कोटींच्या अर्थसंकल्पात फेरफार न करता मंजूर केला. यात पालिकेचा महसुली उत्पन्नात 589 कोटी 58 लाख, भांडवली निधी 70 कोटी 35 लाखांचा समावेश आहे.

आयुक्तांनी शिफारस केलेले उपविधी कर रद्द करण्यात आले. नगरसेवकांना विकासकामासाठी 36.10 कोटींची तरतूद यात केली असून, पदाधिकाऱयांच्या खर्चात वाढ सुचविण्यात आली आहे. कोणतीही करवाढ-दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात हद्दवाढ भागात प्रसूतिगृह, नाटय़गृह, इंग्रजी शाळा व रस्ते विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्त्वाच्या सभेत अभ्यासपूर्ण चर्चा होण्याऐवजी रटाळ भाषणबाजी करण्यात सदस्य रंगले होते. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी 866 कोटी 18 लाख 66 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अर्थसंकल्पात हद्दवाढ भागातील नगरसेवकांना 30, तर शहरातील नगरसेवकांना 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकास सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली. आयुक्तांनी सदरच्या अर्थसंकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी सभेत केली.

दरम्यान, भाजपचे नगरसेवक रवी गायकवाड हे सभागृहात आले. आपल्या आसनाकडे जात असताना त्यांचा तोल गेल्याने पडले. यामुळे सभागृहात खळबळ उडाली. तातडीने गटनेते चंदनशिवे, जाधव यांनी धीर देत सभागृहाबाहेर घेऊन गेले. आजारी असतानाही ते सभेसाठी आल्याची चर्चा यावेळी होती.

29 जणांनाच प्रवेश दिल्याने वादावादी

महापौर यन्नम यांनी पक्षीय बलाबलानुसार सभागृहात 29 सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पालिकेत 102 सदस्य असून, अवघ्या 29 पदाधिकारी व सदस्यांना प्रवेश दिल्याने नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व पोलिसांमध्ये पालिकेच्या सभागृहाजवळ वादावादी सुरू होती. या वादामुळे काही नगरसेवकांनी घरी जाऊन ऑनलाइन सभेत भाग न घेता मोबाईल बंद ठेवल्याचे दिसून आले. 15 लाख लोकसंख्या असलेल्या शहराचे अर्थसंकल्प मोजके पदाधिकारी सदस्य असे 29 जणांनी मंजूर केल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या