सोलापूर महापालिकेच्या धडक मोहिमेत 30 मिळकतींवर कारवाई

मार्चएण्ड सुरू झाल्यामुळे सोलापूर महापालिकेने मिळकत कराची वसुली मोहीम दणक्यात सुरू केली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ता कर विभागाच्या विशेष पथकाकडून कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत वसुलीबरोबरच थकीत कर न भरणारे पाच गाळे सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत महापालिकेने 30 गाळ्यांवर कारवाई केली आहे.

सोलापूर महापालिकेच्या मिळकत कर विभागाने चालू आर्थिक वर्षात दिलेल्या 500 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी केवळ 151 कोटी रुपयेच वसूल केले आहेत. यामुळे मार्च अखेरपर्यंत त्यांना आणखी 50 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी विभागाकडून जोरदार धडपड सुरू झाली आहे. यापूर्वी अभय योजना मुदत संपल्यावर जानेवारीमध्ये या विभागाने वसुली आणि कारवाई मोहीम हाती घेतली होती. यादरम्यान त्यांनी 20 कोटींवर वसुली केली होती. या कारवाई मोहिमेत भवानी पेठ, रविवार पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, उत्तर सदर बझार, दक्षिण सदर बझार, विडी घरकुल, 91 पेठ, 58 पेठ, रेल्वेलाईन आदी परिसरातील 19 मिळकतदारांचे 14 गाळे, एक कार्यालय आणि नळजोड तोडण्याची कारवाई केली होती.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्यामार्फत पथकांकडून व झोन कर्मचाऱयांकडूनही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी मालमत्ता कर विभागातील विशेष पथकाने सिव्हिललाईन, मुरारजी पेठ, रेल्वे लाईन, उत्तर कसबा आदी परिसरातील 11 मिळकतदारांकडून त्यांच्या असलेल्या 10 लाख 24 हजार 185 रुपयांच्या थकबाकीपैकी 5 लाख 72 हजार 246 रुपयांचा कर वसूल केला.