सोलापूर येथील प्रसिद्ध विव्हको प्रोसेस मिलच्या जमीनविक्री घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश बोमड्याल यांच्यासह सहसंचालकांना पोलिसांनी अटक केली. हा सुमारे 24 कोटी रुपयांचा घोटाळा असून, न्यायालयाने या घोटाळ्यातील सहाजणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अविनाश बोमडय़ाल, सहदेव हणमंत इप्पलपल्ली, यादगिरी बाळप्पा इप्पलपल्ली, सर्वेशाम शेका येमुल, व्यंकटेश बालाजी बोगा, रामचंद्र बालाजी सामलेटी अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.
अशोक चौक परिसरातील विव्हको प्रोसेस मिलची जागा तत्कालीन संचालक मंडळाने बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री केली आहे. 28 कोटींची जागा अवघ्या 14 कोटींत विक्री केली असून, मिलच्या व्यवहारात 24 कोटी 33 लाख 86 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका पणन विभागाचे लेखाधिकारी बप्पाजी पवार यांनी ठेवला होता. याप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.
याप्रकरणी शिक्षा झालेले अध्यक्ष अविनाश बोमडय़ाल व वरिल आरोपीसह श्रीहरी रामण्णा विडप (मयत), संजय भुमय्या कोंडा, मनोहर पापय्या इगे, श्रीहरी हणमय्या इराबत्ती, लक्ष्मीनारायण शंका देवसानी, वेणुगोपाल केशव अंकम, कल्पना श्रीहरी रापोल, मंगय्याबाई कृष्णहरी आडम यांच्याविरुद्ध मिलच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. यातील अध्यक्ष बोमडय़ालसह वरील सहाजणांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या अटकेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.