सोलापूर – ऑक्सिजनअभावी ‘रेमडेसिविरच्या कच्च्या मालाचे उत्पादन ठप्प

जगात हाहाकार माजविणाऱया कोरोना या जीवघेण्या आजारावर प्रभावी ठरलेल्या ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱया महत्त्वाच्या तीन घटकांचा कच्चा माल जगभरात सोलापुरातील विख्यात ‘बालाजी अमाइन्स’ कंपनीतून पुरविला जातो. हे घटक तयार करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. सध्या ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरासाठी बंदी घातल्याने कच्च्या मालाचे उत्पादन करणे अडचणीत आले आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असताना, शासनाने आज ‘बालाजी अमाइन्स’ला ऑक्सिजन पुरविण्यासाठी पत्र दिले आहे; परंतु यासंबंधी निर्णय आज 22 तारखेनंतरच होणार आहे.

जगाबरोबरच हिंदुस्थानात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी ‘रेमडेसिविर’ हे औषध प्रभावी ठरत असल्याने सर्वत्र मागणी वाढली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळे ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार व दुरुपयोगही वाढल्याने निर्मितीसाठी संकट उभे राहिले आहे. परंतु ‘रेमडेसिविर’च्या निर्मितीसाठी लागणारे मुख्य तीन घटक ‘ट्रायइथाइल अमाइन’, ‘डायमिथाइल फार्मामाइड’ आणि ‘एसिटोनाट्रायल’ यांचे उत्पादन देशात फक्त सोलापुरातील बालाजी अमाइन्स कंपनीमध्येच होते. या घटकांच्या उत्पादनासाठी मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजनची आवश्यकता भासते; परंतु सध्या शासनाने रुग्णांचा विचार करून औद्योगिक क्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात बंदी घातल्याने या घटकांचे उत्पादनही थंडावले आहे. आजही देशाला ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची अत्यंत गरज असताना, उत्पादन म्हणावे इतके होत नाही. त्यामुळे बालाजी अमाइन्सने शासनाकडे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी पाठपुरावा सुरू केला आहे. या औषधी घटकांच्या निर्मितीसाठी इथेनॉल, मिथेनॉल, अमोनिया ऑसिटिक ऑसिड आणि ऑक्सिजनची मोठय़ा प्रमाणावर गरज आहे. सध्या ऑक्सिजनवरच बंदी आणल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. देश-विदेशांतून मागणी असताना, उत्पादन मात्र थंडावले आहे.

200 कोटींचा नवीन प्रकल्प याच महिन्यात कार्यान्वित होणार

n ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा वापर कोविडसारख्या महामारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होत असून, त्याची उपयुक्तताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या मालाची मागणी वाढत असून, त्यामुळे ‘बालाजी अमाइन्स’चे विस्तारीकरण करावे लागत आहे. नवीन 200 कोटींचा प्रकल्प याच महिन्यात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांसाठी ही आणखी एक दिलासादायक बाब ठरणार आहे.

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा कच्चा माल तयार करण्यासाठी ऑक्सिजन हा प्रमुख घटक आहे. ‘बालाजी अमाइन्स’ला हा पुरवठा पुणे येथून होत होता; पण तो आता बंद झाला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या इंजेक्शनसाठीच्या कच्च्या मालाचे उत्पादन थंडावले. यासंदर्भात बालाजी अमाइन्सने अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले असून, शासनाने ऑक्सिजनपुरवठा करण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला आहे. येत्या 22 तारखेपर्यंत उत्पादनात प्रगती होईल, असा आशावाद आहे.

– डी. राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाइन्स, सोलापूर

आपली प्रतिक्रिया द्या