
आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास किलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मान्यतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दिले आहेत.
सोलापूर जिह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 68 उपकेंद्रे यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, सोलापूर जिह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रांचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना बऱयाचवेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र, परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत, शिवाय खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. यामुळे खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.