चीनच्या कुरापती- गलवान खोर्‍यात नदीत पाणी सोडले, मालेगावचे जवान सचिन मोरे शहीद

लडाखच्या गलवान खोर्‍यात चीनच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. या खोर्‍यात हिंदुस्थान लष्कर पुलाचे बांधकाम करीत असताना चीनने धरणातून पाणी सोडले. यावेळी पुलाचे बांधकाम करणारे जवान वाहून जात असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात मालेगावचे सुपुत्र जवान सचिन मोरे शहीद झाले. जवान सचिन मोरे यांच्या वीरमरणाने मालेगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मालेगावच्या साकुरी निंबायती या त्यांच्या मूळगावी शनिवारी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे.

लडाखमधील गलवान खोर्‍यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. चिनी सैनिकांच्या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले. याच खोर्‍यात 115 इंजिनीअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा देणारे वीर जवान सचिन विक्रम मोरे हे तैनात होते. गलवान खोर्‍यातील नदीवर पुलाचे काम सुरू होते. पुलाचे काम सुरू असतानाच चीनकडून या नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे नदीला अचानक पूर येऊन त्या पुरात नदीवर काम करणारे तीन जवान वाहू लागले. हे पाहून सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.  त्या तिघांनाही वाचवण्यात यश आले. मात्र या प्रयत्नात सचिन मोरे यांच्या डोव्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचे निधन झाले. लष्कराकडून आज सकाळी मोरे कुटुंबीयांना हे कळविण्यात आल्यानंतर त्यांच्याकर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी, दोन मुली व सात महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. शनिवारी त्यांचे पार्थिव मूळ गावी साकुरी निंबायती येथे आणल्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या