मालीत लष्कराची बंडखोरी; राष्ट्रपतींना बंदूकीचा धाक दाखवत घेतला राजीनामा

मालीमध्ये लष्कराने बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रपती इब्राहिम बाऊबकर कीस्ता यांनी राजीनामा दिला आहे. बंडखोरी केलेल्या सैनिकांनी राष्ट्रपतींना बंदूकीचा धाक दाखवत अटक केल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मालीमध्ये लष्कराने बंडखोरी केल्यानंतर सत्तापालट होण्याची शक्यता होती. मंगळवारी बंडखोर सैनिकांनी राजधानीतून अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अटक करत अज्ञात ठिकाणी नेले.

वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर बंडखोरांनी त्यांचा मोर्चा थेट राष्ट्रपतींकडे वळवला. त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. राष्ट्रपतींना बंदूकीचा धाक दाखवत त्यांचा राजीनामा घेण्यात आला. लष्कराने बंडखोरी केल्यानंतर सरकारविरोधी घोषणाबाजी करत नागरिकही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. संरक्षण विभागाने लष्कराच्या बंडखोरीबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच नेमके किती अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे, त्याबाबत नेमकी माहिती नसल्याचेही विभागाने म्हटले आहे. याआधीही 2012 मध्ये झालेल्या बंडखोरीनंतर सत्तापालट झाला होता. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती अमादौ तौमानी तौरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता बंडखोरांनी थेट राष्ट्रपतींनाच बंदूकीचा धाक दाखवत त्यांचा राजीनामा घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या