घनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि अपेक्षा

559

सु. ना. पाटणकर (सदस्य, मुंबई विकास समिती आणि निवृत्त मुख्य अभियंता)

मुंबईतील नागरिकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर ओला आणि सुका कचरा निराळा करणे, कचरा निर्माण होण्याच्या जागीच खतनिर्मितीसाठी यंत्रणा उभारणे, जो कचरा पुनर्वापरात आणि पुनर्निर्मिती योग्य आहे तो योग्य ठिकाणी पाठविणे अशी जाणीव दाखविली तर मुंबई महापालिकेच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल होईल. ज्या बाहेरील देशांचे आपण गुणगान करतो तिथे कायद्यांबरोबरच लोकांची इच्छाशक्तीसुद्धा प्रकर्षाने दिसते. म्हणूनच अशा देशांमध्ये घनकचऱ्याच्या नियोजनातून आरोग्यदायी स्वच्छता निर्माण करण्यात ते देश आणि त्यांचे नागरिक यशस्वी झालेले दिसतात.

पाश्चात्य देशातील स्वच्छ रस्ते आणि घन कचरा शिस्तीत हाताळणारे नागरिक हा नेहमीच आपल्या कौतुकाचा विषय असतो. युरोप, अमेरिका, अगदी द. पूर्व आशिया वगैरे परदेश प्रवास याचे हिंदुस्थानीयांना नावीन्य नाही. त्याच वेळेस इतरांच्या ‘शिस्तीचे गुणगान’ आणि ‘अस्वच्छता आपला धर्मच’ ही गोष्ट द. आशियातील नागरिकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे की काय, अशी परिस्थिती! पाणी, हवा आणि जमीन या तीन महत्त्वाच्या घटकांचे प्रदूषण, दुर्लक्षित घन कचरा व्यवस्थापनामुळे पण होते याची प्रकर्षाने जाणीव होण्याची नितांत गरज आहे.

मुंबईच्या घन कचऱ्याचे शास्त्रीयदृष्टय़ा विश्लेषण केले असता असे दिसते की, वजन निकष मानला तर कागद आणि कार्डबोर्डचे प्रमाण १५ टक्के, प्लॅस्टिकचे प्रमाण एक टक्का, धातूंचे प्रमाण १.५ टक्के, काचेचे प्रमाण एक टक्क खतनिर्मिती होऊ शकेल असे विघटनात्मक पदार्थ ३७ टक्के ज्या पदार्थांचे विघटन होऊ शकत नाही असे विटामातींचे प्रमाणे ३५ टक्के आणि इतर साधारण ९.५ टक्के एवढे असते.

संपूर्ण मुंबईत साधारण चार हजार २०० ठिकाणाहून रस्त्यांची झाडलोट केली जाते. साधारण ४० टक्के कचरा रस्त्यातून गोळा केला जातो. त्याचप्रमाणे साधारण चार हजार ठिकाणांहून घरातून कचरा गोळा केला जातो. त्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. निरनिराळ्या आकाराच्या कॉम्पॅक्टर गाड्यातून एकत्रित केलेला कचरा सध्या देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत गोराई येथे पण डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जायचा. हे सर्व करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मजूर आणि साधारण १५०० गाड्यांच्या फेऱ्या आणि इतर प्रचंड यंत्रणा राबवावी लागते. मुंबईत साधारण ८५०० मे.ट. कचरा प्रतिदिनी निर्मित होतो असे दिसते.

मुंबईतील नागरिकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर ओला आणि सुका कचरा निराळा करणे, कचरा निर्माण होण्याच्या जागीच खतनिर्मितीसाठी यंत्रणा उभारणे, जो कचरा पुनर्वापरात आणि पुनर्निर्मिती योग्य आहे तो योग्य ठिकाणी पाठविणे अशी जाणीव दाखविली तर मुंबई महापालिकेच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल होईल. बरीच घट होईल. ज्या बाहेरील देशांचे आपण गुणगान करतो तिथे कायद्यांबरोबरच लोकांची इच्छाशक्तीसुद्धा प्रकर्षाने दिसते. म्हणूनच अशा देशांमध्ये घनकचऱ्याच्या नियोजनातून आरोग्यदायी स्वच्छता निर्माण करण्यात ते देश आणि त्यांचे नागरिक यशस्वी झालेले दिसतात.

मुंबई शहराच्या घन कचऱ्याबाबतीत महापालिकेकडून नियोजन केलेले दिसते. उदा. गोराई येथील डम्पिंग ग्राऊंडचे शास्त्रीयदृष्टय़ा बदल करून खत आणि वीज निर्मितीची प्रक्रिया थोड्याच वर्षांत करण्याची योजना आहे. तीच गोष्ट मुलुंड, कांजूरमार्ग आणि देवनार या तिन्ही ठिकाणी सॅनिटरी लॅण्ड फिलिंगच्या माध्यमातून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, प्रदूषित पाणी कमी करणे वगैरे योजना आखल्या गेल्या आहेत.

अशा सर्व गोष्टींचा विचार करता मुंबई विकास समितीने जो घन कचऱयाच्या विषयासाठी कृतिबंध (FFA) तयार केला आहे. त्यातील काही कामांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे – वाहतूक व्यवस्थेसाठी लागणारे बदल.

  1. जादा कामगारवर्ग नेमणे.
  2. एएलएम (ALM) वगैरे अभियान चांगले राबविणे.
  3. नॉनप्रॉफिट मेकिंग संस्थांना मदत, त्यांचा सहभाग घेणे.
  4. सॅनिटरी बायलॉज सर्वतोपरी कार्यान्वित करणे.
  5. लोकसहभागातून शून्य कचरा परिस्थिती निर्माण करणे आणि कक्ष दहा टक्के घन कचरा भराव जमिनीवर जाईल अशी परिस्थिती निर्माण करणे.
  6. देवनार, मुलुंड, कांजूरमार्ग, गोराई येथील प्रक्रियांचे विभागवार विकेंदीकरण करणे.

वरील कामे पूर्ण केल्यास आणि तशी मोठी आघाडी उघडल्यास मुंबई शहरसुद्धा घन कचरा व्यवस्थापनात जागतिक स्वच्छ शहराच्या दिशेने वाटचाल करू शकेल, पण… मागोवा घेता असे निदर्शनास येते की –

यंत्रसामग्री खरेदी करणे, जास्त मनुष्यबळाची उपलब्धता, सामाईक बीन्सचा (community bins) वापर कमीत कमी करणे आणि घरगुती लहान आकारांच्या डब्याचा वापर जास्तीत जास्त करणे अशा तऱहेच्या कामामध्ये अजूनही प्रगती झालेली दिसत नाही.

सुका कचरा गोळा करून केंद्रांच्या निर्मितीत प्रगती झाली नसल्यामुळे आज तरी शून्य कचरा व्यवस्थापन तेवढे यशस्वी ठरलेले नाही.

देवनार आणि मुलुंड येथील आधुनिकीकरणाचा वेग वाढायला हवा.

गोराई येथील आधुनिकीकरणातून अपेक्षित वीज निर्मिती व्हायला हवी.

मध्यंतरी जनतेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण योग्य तऱहेच्या जाणिवा आणि नेणिवा या दोन्ही गोष्टींचा अभाव आणि असामाजिक पध्दती वगैरे गोष्टींमुळे प्रगती होत नाही.

मुंबई महापालिका प्रत्येक नागरिकामागे दरवर्षी १५०० ते २०००  रुपये एवढा खर्च घन कचरा व्यवस्थापनावर करत आहे असे दिसते, पण या व्यवस्थेसाठी ‘प्रदूषण करणाऱयाने भार सहन करावा’ (Polluter to pay) या न्यायाने कुठचाही वेगळा कर वसूल केला जात नाही.

मुंबई शहराची सामाजिक जडणघडण मिश्र स्वरुपाची आहे. उदा. पैशांची काळजी नसलेले उच्चभ्रू, नागरी गरीब, शहराशी देणेघेणे नसलेल्या बाहेरील व्यक्ती हे सर्व मुंबई शहराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे एकात्मिकतेत आणि अनुबंधात्मक अभाव दिसतो.

घन कचरा व्यवस्थापनात संपूर्णपणे बदल घडवून आणण्यासाठी दोन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करून राबवावा लागेल. तरच कदाचित आपणा सर्वांना असे सांगता येईल की, प्रगत देशाइतकी स्वच्छता मुंबई शहरात आपण आणली आहे आणि त्यात सातत्य दाखवणार आहोत. कोणत्याही शहरातील रस्ते, घन कचऱयाबद्दलची जाणीव आणि स्वच्छता या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास ते शहर कदापि जागतिक स्तराच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाही हे सत्य ओळखण्याची गरज आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या