एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत तोडगा काढा! विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न तसेच लॉकडाऊनच्या काळातील 30 टक्के कर्मचाऱ्यांचे नाकारलेले पगार तातडीने देण्यात यावेत. परिवहन मंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रति दिवस 300 रुपये या प्रमाणातील भत्ता आठवड्याच्या आत द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. या मागणीवर तत्काळ प्रतिसाद देत परिवहनमंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. वेळ पडल्यास कर्ज उभारून कर्मचाऱ्यांचे पगार देऊ असे आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट  घेऊन त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर निवेदनानुसार त्यांनी  कोरोना महामारीच्या काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जाहीर केल्याप्रमाणे 50 लाख रुपये विम्याची रक्कम तातडीने अदा करावी, अशीही मागणी केली. कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही सेवकांचे वेतन कापू नये, त्यांना वेतन वेळेत द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी शालेय पोषण आहार, रेशन अन्नधान्य, शेतीची बी-बियाणे, खते, अंगणवाडीसाठी लागणारे अन्नधान्य आणि अन्य मालवाहतुकीचे कंत्राट एसटीला देण्यात यावे. एसटी महामंडळाला प्रवासी करातून सूट देण्यात यावी. डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करातून एसटी महामंडळाला वगळण्याबाबतही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशा काही प्रमुख सूचनाही दरेकर यांनी परिवहन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या