गेल्या महिनाभरापासून अपुऱ्या पाणीपुरवठयाच्या समस्येमुळे लालबागच्या साईबाबा रोडवरील कात्रादेवी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील रहिवासी त्रस्त आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा पाणी खाते विभागावर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.
पाणी कपातीच्या नावाखाली लालबागमधील कात्रादेवी को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांना गेल्या महिन्यापासून 40 ते 50 टक्के पाणीपुरवठा कमी होत होता. याबाबत पालिकेकडे सातत्याने तक्रार करूनसुद्धा त्यावर संबंधित विभागाकडून काहीही उपाययोजना केली जात नव्हती. शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी कार्यकारी अभियंता हातेकर यांना संपर्क साधून एफ/दक्षिण विभागाचे सर्व संबंधित अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व रहिवाशांच्या समोर चर्चा केली. पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणी खाते विभागावर सर्व महिलांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी खाते विभागातर्फे टँकरची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासित केले. यावेळी उपशाखा संघटक प्रेमा सावंत, गटप्रमुख चेऊलकर, बर्वे आणि महापालिकेचे सर्व अधिकारी, रहिवासी उपस्थित होते.