‘ही तर सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी’, नव्या संसद भवनावरून काँग्रेस आणि तृणमूलकडून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Somalia-india-parliament

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (28 मे) संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. मात्र पंतप्रधान मोदीच हा इमारतीचं उद्घाटन करणार असल्यानं आणि राष्ट्रपतींना देखील या सोहळ्याचं निमंत्रण नसल्यानं 19 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या इमारतीचं उद्घाटन केलं. आता या संसद भवनावरून विरोधक प्रश्न उपस्थित करू लागले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि तृणमूलचे खासदार जवाहर सरकार यांनी संसदेच्या नवीन इमारतीचं डिझाईन आफ्रिकेतील देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी असल्याचा दावा केला आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ‘सोमालियानं नाकारलेली जुनी संसद ही नव्या हिंदुस्थानची प्रेरणा!!’ असं म्हणत खिल्ली उडवली आहे. पुढे ते लिहितात की ‘गुजरातमधील मोदींच्या वास्तुविशारदाने – जो नेहमी ‘स्पर्धात्मक बोली’ द्वारे मोदींचे मेगा कॉन्ट्रॅक्ट मिळवतो (अहमदाबाद, वाराणसी, दिल्लीची संसद + सेंट्रल व्हिस्टा) सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यासाठी त्यानं आमच्याकडून ₹230 कोटी शुल्क आकारले आहे!’, असा आरोप केला आहे.

हेच ट्विट दिग्वजय सिंग यांनी रिट्वीट केलं आहे. त्यासोबतच त्यांनी लिहिलं आहे की, ‘जवाहर सरकार तुम्हाला फुल मार्क्स. तुम्ही विश्वास ठेवू शकतात का !! सोमालियानं नाकारलेलं संसद भवन हे आमचे नरेंद्र मोदीजींचं प्रेरणास्थान!!’. ते पुढे PMOIndia ला टॅग करत लिहितात की, ‘कृपया तुमच्या कॉपी कॅट आर्किटेक्टकडून ₹230 कोटी वसूल करा’.