मारटकर हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंडाला ससून रुग्णालयात भेटले, सहा पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

शिवसेनेचे कसबा विधानसभा युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींनी कुख्यात गुंड बापू नायर याची ससून रुग्णालयात भेट घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावेळी त्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या कोर्ट कंपनी कर्मचाऱ्यांनी आरोपींना भेटून कसे दिले, असा ठपका ठेउन प्रशासनाने 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून मारटकर यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार 11 जणांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. मारटकर यांच्या हत्येपुर्वी आरोपींनी कुख्यात गुंड नायर याची ससून रुग्णालयात भेट घेतली होती. त्याचा ठपका ठेउन पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मात्र त्यांची नावे जाहीर करण्यास पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणात निलंबित केलेल्या कोर्ट कंपनीमधील एक हवालदार आणि 5 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. सर्व कॉन्स्टेबल 2016 बॅचचे असून हवालदाराची रेल्वे पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती.

बंदोबस्त असतानाही कुविख्याताला आरोपी भेटले

कुविख्यात गुंड बापू नायर सध्या येरवडा कारागृहात आहे. काही दिवसांपुर्वी उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असताना आरोपी नायरला भेटले कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर प्रकरणाची खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली. त्यानुसार कामात कुचराई करित पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या