कोट्यावधीचा चुराडा करणारे जिल्हा रुग्णालय खाजगी रुग्णालयाचा आधार का घेते?

36

सामना प्रतिनिधी । बीड

एका मातेचा जन्माला आलेला मुलगा गायब झाला या गंभीर घटनेला जबाबदार कोण हा सवाल आता उपस्थित होत आहे. महिन्याकाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा करणारे नवजात अर्भक उपचार केंद्र जनतेच्या दिमतीला असतांना या चार तासाच्या बाळाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयाकडे का पाठवले? आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत.

बीडच्या जिल्हा रुग्णालयातून नवजात बालक गायब झालं. जन्माला मुलगा आला अन हातात मुलगी दिली गेली. मग तो मुलगा कोठे आहे. अजूनही तपास यंत्रणेला ताळमेळ लागेना. यंत्रणा डीएनएच्या अहवालाची वाट पाहत आहे. सात दिवसानंतर अहवाल येईल तेथून पुढे तपासाला सुरुवात होईल. पंधरा दिवसाचा उलटलेला कालावधी तपासाला कितपत यश देईल या बाबत शंका उपस्थित होत आहे. मुळात जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. रुग्णालयात नवजात अर्भक उपचार केंद्र थाटले आहे. एक इंचार्ज सहित एकूण नऊ तज्ञ डॉक्टर दिमतीला आहेत. यावर महिन्याकाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा होत आहे. एवढी यंत्रणा दिमतीला असतांना चार तासाच्या बाळाला उपचारसाठी खाजगी रुग्णालयात का पाठवले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयन्त केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. बीडच्या जिल्हारुग्णालयाचा कारभार रामभरोसे चालतो. तज्ज्ञ डॉक्टर ज्यांना महिन्याकाठी लाख रुपये पगार आहे, असे डॉक्टर केवळ पंधरा मिनिटांसाठी येतात. एक राउंड मारून ते आपल्या खाजगी रुग्णालयाकडे पसार होतात. मग रूग्णांवर शिकाऊ डॉक्टर प्रयोग करतात. नवजात अर्भक उपचार केंद्रात गेल्या काही महिन्यांपासून व्हेंटिलेर उपलब्ध नाही. वॉर्म मशीन बंद आहेत. कावीळसाठी असणारी फोटो थेरेपी मशीन एकच आहे, अशी अवकळा का आली. कोणी आणली. यालाही हे तज्ञ डॉक्टर कारणीभूत आहेत. सुसज्ज यंत्रणा राबवली तर ती वापरण्यासाठी आपल्याला जातीने जिल्हारुग्णालयात थाबावे लागेल. त्या पेक्षा यंत्रसामुग्री नसेल तरच आपला फायदा हा दृष्टीकोन आहे रुग्ण सेवा करणाऱ्या काही डॉक्टरांचा . म्हणूनच जिल्हारुग्णालय केवळ दलालांचा अड्डा झाला आहे, निष्क्रियता, गाफीलपणा आणि बेजाबाबदारीवृत्ती या घटनेला कारणीभूत आहे.

बाल मृत्युदर लपवला जातो
बाल मृत्युदर नियंत्रणात आणा असा सरकारचा आदेश आहे, म्हणजे योग्य आरोग्य सेवा पुरवा असा त्यांचा उद्देश मात्र बीड च्या जिल्हारुग्णालयात धक्कादायक बाब समोर येत आहे, बाल मृत्युदर कमी दाखवण्यासाठी जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असेल किंवा ते जाणारे असेल तर त्या बाळाची इन्ट्रीच online ला होत नाही . बाळ सुस्थितीत असेल तर त्या बाळाची प्रवेश प्रक्रिया केली जाते, म्हणजेच बीड च्या जिल्हारुग्णालयात वर्षाकाठी कमीत कमी तीनशे नवजात अर्भकांचा मृत्यू होतो रेकॉर्डवर मात्र चाळीस पन्नास बालक दगावल्याचे दाखवले जाते . दोन वेगवेगळ्या रजिस्टर द्वारे बाल मृत्यू दर लपवला जातो

कारवाई काय होणार?
बीड च्या जिल्हारुग्णालयात जिल्हा चिकित्सक डॉ अशोक थोरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेऊन आरोग्य प्रशासन गतिमान करत आहेत जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करण्याचा प्रामाणिक प्रयन्त त्यांचा सुरू असताना मस्तावलेले आरोग्य प्रशासन आणि तज्ञ डॉक्टर मात्र त्यांना आरोग्य सेवेच्या कामात सहकार्य न करता कोंडी करण्याचा पर्यंत करत आहेत, अनेक गंभीर बाबी अजून समोर येत आहे . कुचकामी यंत्रणेवर काय कारवाई केली जाणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या