लातूरमध्ये पोटच्या मुलाने संपत्तीसाठी पाजले आई-वडिलांना विष

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका उच्चशिक्षित मुलाने संपत्तीच्या वादातून आई-वडिलांना नारळ पाण्यात विष घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सादूराव कोटम्बे यांचा मृत्यू झाला आहे. तर आई गयाबाई कोटम्बे यांची प्रकृती चिंताजनक आहे. सदर प्रकाराबाबत माहिती मिळ्यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

लातूरमधील मोरे नगरमध्ये राहणाऱ्या कोटम्बे कुटुंबामध्ये संपत्तीच्या वाटपावरून वाद सुरू होता. आईवडिलांनंतर सर्व संपत्ती आपल्यालाच मिळेल या लालसेपोटी मुलगा ज्ञानदीप कोटम्बे याने आईवडिलांच्या हत्येचा कट रचला. त्याने नारळ पाण्यात विष टाकून आई-वडिलांना ते पाणी प्यायला दिले. पाणी प्यायल्यानंतर पाण्याची चव कडवट लागल्याने आईला संशय आला आणि तिने ते पाणी पिणे टाळले परंतु त्या आपल्या पतीला थांबवेपर्यंत फार उशिर झाला होता. तोपर्यंत सादूराव यांनी ते पाणी प्यायले होते. गयाबाई यांनी ताबडतोब त्यांना स्थानिक रूग्णालयात हलविले मात्र कोटम्बे यांच्या संपूर्ण शरिरात विष पसरल्याने त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.

ज्ञानदीप यांचे साधारणतः महिन्याभरापूर्वीच लग्न झाले होते. आई-वडील त्यांच्या मोठ्या मुलाकडे संभाजीनगरमध्ये राहत होते. संपत्तीची वाटणी होत नसल्याच्या रागाने ज्ञानदीपने हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मुलगा ज्ञानदीप कोटम्बे याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या