लातूर- बायकोला नांदवण्यास सासऱ्याचा नकार, जावयाने केला चाकूने हल्ला

बायकोला नांदवण्यासाठी पाठवत नाही म्हणून लातूर येथे जावयाने सासऱ्यावर आणि त्याच्या भाच्यावर चाकूने हल्ला केला. काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या मारहाण प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मारहाण प्रकरणी किशन गोपा पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी व त्यांचा भाचा अर्जुन प्रकाश राठोड हे 25 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करीत होते. त्यावेळी फिर्यादीचा जावई आकाश आण्णाराव होदाडे आणि त्याचा मित्र अक्षय गोवे हे तिथे आले.

माझ्या बायकोला का नांदण्यासाठी पाठवत नाही, असे आकाश याने विचारले असता फिर्यादीने तुम्ही सतत पैशाची मागणी करीत आहात, त्यामुळे मी मुलीला नांदायला पाठवणार नाही, असे म्हटले. त्यावर आकाश होदाडे याने आपल्याजवळील चाकूने फिर्यादीचा भाचा अर्जुन राठोड याच्या डोक्यात पाठीमागील बाजूस वार केला. तसंच, फिर्यादीच्या पोटावर वार केला.

आकाश याच्यासोबत आलेल्या अक्षय याने हातातील लाकडी दांडका आकाश याच्याकडे दिला आणि त्याने पुन्हा दोघांनाही बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश आण्णाराव होदाडेव आणि अक्षय गावे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 307, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या