दागिन्यांना वाटेकरू होऊ नये यासाठी शक्कल लढवली, सासरा गावी जाताच जावयाने त्यांचे घर फोडले

सासऱयाकडे असलेले दागिने तिघी बहिणींमध्ये वाटप होण्याऐवजी ते सर्व आपल्यालाच मिळावे यासाठी एका जावयाने शक्कल लढवली. सासरा काही करू शकणार नाही असे गृहित धरून त्याने एका नशेबाज गुन्हेगाराला हाताशी घेऊन कट रचला. सासरा गावी जाताच त्या दोघांनी त्यांचे घर पह्डून सर्व दागिने लंपास केले. दागिने परत मिळविण्यासाठी सासरा पोलिसांकडे फार पाठपुरावा करणार नाही असा त्याचा समज होता, पण टिळक नगर पोलिसांनी शिताफीने तपास करीत जावई आणि त्याच्या सहकाऱयाला बेडय़ा ठोकल्या.

पवन जाधव (32) असे आरोपी जावयाचे नाव आहे. पवन हा त्याच्या सासऱयाचा तीन नंबरचा जावई आहे. सासरा घरात एकटाच राहत असून घरात दागिने असल्याचे रिक्षाचालक असलेल्या पवनला माहीत होते. त्या दागिन्यांचे तिघी मुलींमध्ये वाटप होईल. तसे होण्याऐवजी ते सर्व दागिने आपणच मिळवू असा पवनचा विचार होता. त्यानुसार त्याने कट रचला आणि घरपह्डी करण्यात सराईत असलेल्या अर्जुन शिंदे या गुन्हेगाराला हाताशी घेतले. 5 नोव्हेंबर रोजी सासरे गावी गेलेले असताना दोघांनी मिळून त्यांचे घर पह्डले आणि सर्व दागिने घेऊन दोघे पसार झाले. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात घरपह्डीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल वाघमारे तसेच संजय शिंदे, सत्यवान साठेलकर, अंबादास सानप, किशोर रोंगटे आणि गणेश गायकवाड यांच्या पथकाने तपास करून आरोपींना ताब्यात घेतले.