वडिलांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून मुलाने जीवन संपवले

वडिलांवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्याच रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून मुलाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील पायोस रुग्णालयात घडली.

हार्दिक प्रकाश रुपानी (वय ३८, रा. गल्ली नंबर ६, जयिंसगपूर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद जयिंसगपूर पोलिसांत झाली आहे. मुलाने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही.

२९ सप्टेंबर रोजी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाटा येथे झालेल्या अपघातात मोपेडस्वार प्रकाश रुपानी जखमी झाले होते. त्यांच्यावर पायोस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हार्दिक हादेखील रुग्णालयात त्यांच्यासोबत असायचा. रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून त्याने उडी मारल्याचा प्रकार उघडकीस आला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली होती. याबाबत विधित कनक वेद (रा. गणपती पेठ, सांगली) यांनी पोलिसांत माहिती दिली.