वृद्ध आईच्या नशिबी जिवंतपणीच स्मशान

16

सामना ऑनलाईन । नगर

आपल्याला जग दाखविणाऱ्या मातेविषयी कृतज्ञता बाळगणे हे कर्तव्यच, मात्र जिवंतपणीच जन्मदात्रीला स्मशान दाखविणारा कृतघ्न (कु)पुत्रही असतो. याचा विदारक प्रत्यय नगरमध्ये आला. बायकोशी पटत नाही म्हणून मुलाने जन्मदात्या वृद्ध आईला जिवंतपणीच स्मशानात सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नातं मोठं असल्याचा अनुभव सध्या ही ‘अनाथ’ माता घेते. एका सेवाभावी संस्थेने वृद्ध मातेला आधार देऊन आयुष्यभर तिच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

लक्ष्मीबाई आहुजा असे वृद्ध मातेचे नाव असून त्यांच्या मुलानेच त्यांना स्मशानभूमीत आणून सोडले आहे. घरातील सासू-सुनेच्या वादातून मुलाने त्यांना स्मशानात सोडले. अंत्यविधीचा चौथरा हाच जीवन जगण्याचा त्यांचा सहारा झाला होता, तर श्राद्धाचे अन्न हेच जगण्याचे साधन होते. ऊन, वारा, पाऊस अशा परिस्थितीमध्ये कोणी कोणाला साथ देते, पण या ७० वर्षीय लक्ष्मीबाईंना कोणाचाच सहारा राहिला नाही. स्मशानभूमीतच गुजराण करत त्यांना राहावे लागले. आजारी असल्यानंतरही आपल्याला कोणी पाहायला आले नाही. तसेच लवकरच तुला घरी घेऊन जातो असे मुलगा सातत्याने सांगतो पण केव्हा घरी नेणार हे सांगत नाही. एवढे सगळे होऊनही ‘मुलगा वाईट नाही, पण सुनेशी पटत नाही म्हणून त्याने मला इथे ठेवले आहे’ असे लक्ष्मीबाई सांगतात. यावरून आईचे काळीज किती क्षमाशील असते याची कल्पना येते. आता मुलगा कधी घरी घेऊन जातो याचीच वाट लक्ष्मीबाई बघत आहेत.

‘माऊली’ने दिला आधार

मुलाने आईला स्मशानात सोडल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर मुंबई, पुणे येथील अनेक सेवाभावी संस्थांनी संपर्क करून आजींची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र नगर येथील ‘माऊली’ या सेवाभावी संस्थेने लक्ष्मीबाईंची जबाबदारी स्वीकारून त्यांना आधार दिला. आयुष्यभर आम्ही आजींचा सांभाळ करणार असल्याचे संस्थेचे राजेंद्र धामणे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या