ऊसतोडणी मजुराचा मुलगा झाला मोटार वाहन अधिकारी

37

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील भूषण जवाहर राठोड यांनी वडिलांचे छत्र हरवलेले असतानाही प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. त्यांची सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली असून याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर व आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

२७ घरांच्या वरवंडी तांड्यावरच्या शाळेत इतर गावांतून व तांड्यातून १४० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. ही महत्त्वपूर्ण घटना आहे. ऊसतोडणी करून संसार चालविणाऱ्या पालकांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आहे. या पालकांनी ४ लाख रुपयांचा निधी स्वकष्टातून शाळेच्या विकासासाठी दिला आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. या शाळेने आयएसओ दर्जा प्राप्त केला आहे. शिक्षणाचा हा वारसा असल्यानेच भूषण राठोड यांनी हे यश प्राप्त केले आहे. या तांड्यातूनच देशाच्या प्रशासनात नेतृत्व करणारे युवक जन्माला येतील, असा विश्वास पवनीत कौर यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी आमदार संदिपान भुमरे म्हणाले की, वरवंडी तांडा शाळेने व ग्रामस्थांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जो ध्यास घेतला आहे, त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या शाळेच्या संरक्षण भिंतीला स्वेच्छा निधीतून आठ लाख रुपये निधी दिला आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांना हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज दाखविण्यासाठी विमानाने घेऊन जाण्याचा माझा संकल्प आहे व या शाळेची अद्ययावत इमारतही उभी करण्याचा निर्धार आहे.

शिक्षणाधिकारी सुरजकुमार जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, या शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे या तांड्यावर नवीन पहाट होत आहे. सी.एस.आर.च्या निधीतून या तांड्यावरील शाळेस आंतरराष्ट्रीय दर्जाची झीरो एनर्जीची इमारत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शाळेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सत्कारास उत्तर देताना भूषण राठोड म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा व शिक्षक आईच्या भूमिकेतून कार्य करीत आहेत. मी माझा पहिला पगार या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी देत आहे. या शाळेतून प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत, यासाठी मी पुढील काळातही यथाशक्ती मदत करण्यास तयार आहे.

प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एल. ब्रह्मणात यांनी केले. सूत्रसंचालन भरत काळे यांनी तर नंदिनी चव्हाण, मधू राठोड, रोहन राठोड या विद्याथ्र्यांनी मनोगत व्यक्त केले. पूजा चव्हाण, राम राठोड या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, पंचायत समितीचे सभापती गबाबाई चव्हाण, गटशिक्षणाधिकारी खान, शिक्षण विस्तार अधिकारी केदार, कृष्णा चव्हाण, गोरख चव्हाण, बाबासाहेब राठोड, सरपंच अशोक राठोड, आसाराम सोंडगे, आत्माराम गोरे, सुभाष मानके, गजेंद्र बारी, गोरख राठोड, धामसिंग राठोड, हिरामण राठोड, युवराज राठोड, शिवलाल राठोड, मच्छिंद्र चव्हाण, उमेश सोनवणे, सुभाष राठोड, धनसिंग राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी अशोक चव्हाण यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या