लॉक डाऊनमुळे अडकलेली आई घरी परतली, मुलगा-सुनेचा घरात घेण्यास नकार!

2283

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. अनेक स्थलांतरित मजूर आणि इतर नागरिक जे वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले होते, त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलं. मात्र, एका 80 वर्षांच्या आईला कोरोनाच्या भीतीमुळे मुलाने आणि सुनेने घरात घेण्यास नकार दिल्याची घटना तेलंगणात घडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणा येथील करीम नगर येथे ही घटना घडली आहे. येथील एक 80 वर्षीय महिला महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. दरम्यान लॉकडाऊन झाल्याने तिथेच अडकून पडली. महत्प्रयासानंतर ती शुक्रवारी तिच्या तेलंगणातील घरी पोहोचली. पण, तिथे तिच्यासाठी वेगळंच मांडून ठेवलं होतं.

घरी पोहोचल्यानंतर तिच्या मोठ्या मुलाने आणि सुनेने कोरोनाच्या भीतीने तिला घरात घेण्यास नकार दिला. तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला तरीही तो बधला नाही. ती महिला लहान मुलाच्या घरी गेली, तेव्हा तो आधीच घराला कुलूप लावून तिथून निघून गेला होता. त्यांच्या काही शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून तिच्या मोठ्या मुलाला आणि सुनेला समजावलं आणि तिला घरात प्रवेश मिळवून दिला. या महिलेची कोरोना चाचणी होईल आणि ती पॉझिटिव्ह निघाल्यास तिला क्वारंटाईन केलं जाईल, अशी माहिती ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या