मुलाने घेतला वडिलांच्या खुनाचा बदला, नारायणगव्हाणच्या माजी सरपंचाच्या हत्येचे गुढ उकलले

प्रातिनिधिक फोटो

नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. एकटय़ानेच तलवारीने वार करीत राजारामचा खून केल्याची कबुली संग्रामने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली आहे.

राजकीय वर्चस्व, आपसातील भांडणांच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री शार्प शूटरकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती. याप्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल, तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजारामसह इतर आरोपींना न्यायालयाने पॅरोल रजा मंजूर केली असून, वर्षभरापासून राजाराम नारायणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता.

दरम्यान, राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम याच्या मनात होती. राजाराम सुटीवर आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार उपलब्ध करून ठेवली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजारामच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संग्राम संधी शोधत होता. शुक्रवारी दुपारी राजाराम शेततळ्याचे काम करणाऱया मजुरांना सूचना देऊन एकटाच परतत होता. तीच संधी साधत संग्रामने पाठीमागून येत राजारामच्या मानेवर तलवारीने वार केला. एका वारातच राजाराम जमिनीवर कोसळला. तो कोसळल्यानंतर मानेवर आणखी दोन वार करून पुन्हा उसामध्ये लपल्याची कबुली संग्रामने दिली.

राहुल शेळके याने दिलेल्या फिर्यादीमधील गणेश भानुदास शेळके तसेच अक्षय पोपट कांडेकर यांना शनिवारी अटक करण्यात आली. गणेश शेळके हा पोलीस दलामध्ये नगर येथे चालक म्हणून कार्यरत आहे. त्याला नगर येथून ताब्यात घेण्यात आले. तर, अक्षयला श्रीगोंदे तालुक्यातील म्हसे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.

हत्येनंतर घेतला पानाच्या विडय़ाचा आस्वाद

संग्रामने हत्येआधी अंगावर दोन टी शर्ट परिधान केले होते. हत्येनंतर वरचा टी शर्ट काढून त्याने उसामध्ये फेकून दिला. तलवार त्याने घराजवळील डेअरीमध्ये ठेवून दिली. त्यानंतर तो दुचाकीवरून शिरूर येथे गेला. एटीएममधून पाचशे रुपये काढून त्याने पानाच्या विडय़ाचा आस्वाद घेतला. त्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्रामला अटक केली. संग्रामने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे गुह्याची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या