ईशान्य हिंदुस्थानचा दौरा करण्याची अमित शहा यांची हिंमत नाही – सोनिया गांधी

685

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. आसाम,त्रिपुरासह ईशान्य हिंदुस्थानात या कायद्याविरोधात हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. ईशान्य हिंदुस्थानात हिंसाचार उफाळल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तिथे जाण्याची हिंमत नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य हिंदुस्थानात वातावरण तापले आहे. आसाम आणि त्रिपुरातील काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. अमित शहा रविवारी ईशान्य हिंदुस्थानचा दौरा करणार होते. मात्र, राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा रद्द केला. देशात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणे हे सरकारचे काम आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत संविधानाचे रक्षण सरकारने करायचे असते. मात्र, भाजप सरकारने देश आणि देशातील नागरिकांवरच हल्ला चढवला आहे. मोदी सरकार हिंसाचार आणि फूटीची जननी बनल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला. सरकारने देश द्वेषाच्या आगीत लोटल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे युवकांचे भविष्य अंधारात असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या