राहुल गांधींचे नो… नाय… नेव्हर! पद न सोडण्याची 51 खासदारांची विनंती देखील फेटाळली

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची एक बैठक बोलण्यात आली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या 51 खासदारांनी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याचा आग्रह केला. पण ते देखील राहुल यांचे मन वळवू शकलेले नाहीत. काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्यावर राहुल गांधी ठाम असून खासदारांच्या विनवणीनंतर देखील त्यांनी नो… नाय… नेव्हर… अशी भूमिका कायम ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार खासदारांनी राहुल गांधी यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकांमधील पराभव ही आपल्या एकट्याची जबाबदारी नसून सामूहिक जबाबदारी आहे, असा तर्क खासदार शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी मांडला. मात्र पराभवाची नैतिक जबाबदारी ही माझीच आहे, असे म्हणत राहुल गांधींनी राजीनाम्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 51 खासदार त्यांना विविध पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आपला निर्णय पक्का असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा विचार बोलून दाखवला. काँग्रेसच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत देखील त्यांनी राजीनामा देण्याचा विचार प्रस्तुत केला होता. मात्र कार्यकारणी समितीने मात्र त्यास नकार दर्शवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या