सोनिया, राहुल, प्रियंका गांधींची कोरोना टेस्ट करा, NDA खासदाराची मागणी

सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी हे नुकतेच इटलीतून परतले आहेत. त्यांची कोरोना टेस्ट करावी अशी मागणी खासदार हनुमान बेनीवाल यांनी केली आहे. इटलीमध्येही कोरोना विषाणू पसरल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष हा भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. या पक्षाचे चे खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले की इटलीमध्येही कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे नुकतेचे इटलीहून परतले आहेत. त्यांना या विषाणूची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांची चाचणी घेतली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग वेठीस धरले आहे. प्रत्येक क्षेत्राला याची हानी पोहोचली आहे. चीनमधून फैलावलेल्या कोरोनाची जगभरातील दहशत वाढतीच आहे. सोमवारी या महाभयंकर विषाणूच्या बळींची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर 88 हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. एकट्या चीनमध्ये सोमवारी एका दिवसात 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर दक्षिण कोरियात कोरोनाचे 500 नवीन रुग्ण आढळले. विविध देशांत हातपाय पसरणाऱ्या या विषाणूला आळा घालायचा कसा, असा यक्षप्रश्न सध्या जगासमोर उभा ठाकला आहे.

हिंदुस्थानातही 29 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला या विषाणूने डोके वर काढून सर्वांचीच चिंता वाढवली आहे. सोमवारी दोन, तर मंगळवारी आठ संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बुधवारी इटलीहून परतलेल्या आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. इराणमध्ये अडकलेले जे हिंदुस्थानी मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत त्यांच्या तपासणीनंतर सरकार तेथेच तात्पुरती प्रयोगशाळा उभारणार आहे.

परदेशात कोरोनाची लागण झालेले 17 हिंदुस्थानी आहेत. यातील 16 जण जपानच्या जहाजावर आहेत, तर एक कोरोनाबाधित हिंदुस्थानी दुबईत आहे. सरकारने आतापर्यंत 723 हिंदुस्थानींना चीनमधून मायदेशी आणले आहे. याकामी एअर इंडियाचे 6 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशाचप्रकारे जपानच्या जहाजांवरून 119 हिंदुस्थानींना आणण्यात आले अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी संसदेत दिली.

आपली प्रतिक्रिया द्या