सोनखेडमध्ये धुमाकूळ घालणारा वानर अखेर जेरबंद, गावातील 50 लोकांना केले होते जखमी

निलंगा तालुक्यातील सोनखेड येथे मागील चार दिवसांपासून वानराने धुमाकूळ घातला होता. या वानराने 50 महिला व पुरुष व वयोवृद्ध लोकांना तसेच त्याला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना जखमी केले होते. परंतु तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर आज अखेर संभाजीनगरच्या वन विभागाच्या पथकाने त्या वानरासह इतर सोबतच्या वानरांना जेरबंद केले आहे.

गावात या वानराने धुमाकूळ घातल्यामुळे त्याला लोकांनी हाकलुन देण्याचे प्रयत्न केले पण तो चवताळल्यामुळे लोकांच्या अंगावर झडप घालत जखमी करत होता. त्यामुळे लोकांनी शेवटी दोन दिवसानंतर वानराला पकडण्यासाठी वन विभागाला कळविल्यानुसार विभागाचे 50 हून अधिक कर्मचारी गावात दाखल झाले होते. दोन दिवस प्रयत्न करत असताना या वानराने पथकातील तीन कर्मचाऱ्यांना जखमी केले होते. त्यामुळे अखेर येथील वन विभागाचे पथक हतबल झाल्यामुळें अखेर काल दिनांक 26 रोजी संध्याकाळी संभाजीनगर येथील वन विभागाचे पथक गावात दाखल झाले. अंधार असल्यामुळे दिनांक 27 रोजी सकाळी सापळा लावण्याचे ठरले. त्यानुसार आज सकाळी संभाजीनगर येथील पथकाने सापळा त्या वानराच्या येथे ठेवला आणी तो वानर अगदी सहजरित्या ताब्यात आला.

या वानराला पकडल्यामुळे व सोबतच्या वानरांनाही वन विभागाने सतर्कता म्हणून उपचारासाठी संभाजीनगर येथे घेऊन गेले त्यामुळे गावकऱ्यांनी अखेर चार दिवसानंतर सुटकेचा निःश्वास घेतला. गावकऱ्यांनी वन विभाग प्रशासनाचे आभार मानले.

चार दिसानंतर वन विभागाकडून वानराला पकडण्यात आले यश…

सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने वन अधिकारी संतोष बन, देवणी विभागाचे वन अधिकारी नामदेव डिगोळे, डी. डी. मंगरुटे, एस. वाय. बडगणे, पारसेवाड आदींचे पथक व संभाजी नगर येथील पथकाने माजलेल्या या वानराला पकडण्यात यश मिळविले.