लॉटरीच्या १५ लाख गमावलेल्या बापाची मुलाने केली हत्या

39

सामना ऑनलाईन । ठाणे

लॉटरीच्या व्यसनापायी १५ लाख रुपये गमावलेल्या मरिमुथू कोनार या ५७ वर्षं वयाच्या माणसाची त्याचाच मुलगा आणि सुनेने हत्या केली. कल्याण येथे एका खासगी कार्यालयात ड्रायव्हरचे काम करणारे मरिमुथू कोनार  हे आपले दोन मुलगे आणि सुनेसह राहत होते. मरिमुथू यांना लॉटरीचं वेड होतं. वडिलांना असलेलं हे लॉटरीचं व्यसन मुलगा कार्तिक (२७), त्याची पत्नी राजश्री (२५) आणि धाकटा मुलगा व्यंकटेश (२५) यांना पसंत नव्हतं.

त्यातच लॉटरीसाठी पैसे पुरत नसल्याने राहतं घर विकण्याचा निर्णय मरिमुथू यांनी घेतल्याने घरात वादाला सुरुवात झाली. हा वाद सुरू असताना रागाच्या भरात दोन्हीही मुलगे आणि सुनेने मरिमुथू यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोनार यांच्या घरातून ओरडा ऐकू आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस घरी यायच्या आत या तिघांनी मरिमुथू यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे डॉक्टरांनी मरिमुथू यांना मृत घोषित केलं.

या प्रकरणी पोलिसांनी कार्तिक, राजश्री आणि व्यंकटेश यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सुरुवातीला या तिघांनीही वडील पायऱ्यांवरून घसरून पडल्याचा कांगावा केला. मात्र, कसून चौकशी करताना राजत्री आणि व्यंकटेश यांनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या