सोनीलिवतर्फे ‘पापा वुई लव्ह यू टू’ आणि ‘द गिफ्ट’ हे दोन लघुपट प्रदर्शित

19

सामना ऑनलाईन। मुंबई

आजचे आपले आयुष्य म्हणजे कधीही न संपणा-या डेडलाइन्स, घरातली कामे, कुटुंबाप्रति असलेली कर्तव्ये आणि कामाचा ताण यांची मालिकाच झाली आहे. वाढता तणाव आणि घटता आनंद यांच्या या चक्राचा आधुनिक काळातल्या नातेसंबंधांवर परिणाम होत आहे . याच विषयावर आधारित सोनीलिवने ‘पापा वुई लव्ह यू टू’ आणि ‘द गिफ्ट’ हे दोन लघुपट नुकतेच प्रदर्शित केले .

जिमी शेरगिल, लेख टंडन, गुल पनाग, मंदिरा बेदी आणि कुशल पंजाबी यांच्या भूमिका असलेल्या या दोन्ही लघुपटांमध्ये प्रेक्षक स्वत:चे आयुष्य बघू शकतील. असा विश्वास सोनीलिवने व्यक्त केला आहे.

‘पापा वुई लव्ह यू टू’ या लघुपटातील कथा विकास या ४० वर्षांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. जिमी शेरगिलने रंगवलेला विकास हा एकल पालक (सिंगल पेरेंट) आहे. कामात सतत बुडालेल्या विकासच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहेत व्यावसायिक उद्दिष्टे आणि भौतिक सुखांची प्राप्ती. यामुळे त्याच्या आठ वर्षांच्या मुलाशी असलेले त्याचे नाते हळुहळू कमजोर होत जाते. विकासचे स्वत:च्या वडिलांसोबत असलेले नातेही त्याच्या व त्याच्या मुलाच्या नात्यात डोकावत राहते. विकासच्या वडिलांची भूमिका प्रख्यात दिग्दर्शक, लेखक व अभिनेते लेख टंडन यांनी साकारली आहे.

‘द गिफ्ट’ हा लघुपट प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा आहे. कुशल पंजाबी, गुल पनाग आणि मंदिरा बेदी यांच्या सशक्त व्यक्तिरेखा असलेल्या या कथेत आधुनिक काळातल्या नातेसंबंधांतील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. कथनाची शैली दृश्यात्मकतेवर भर देणारी आहे, तर वेगवान संकलनामुळे आधुनिक जीवनातील कठोरपणा तसेच न संपणा-या इच्छा अनाकलनीय कृत्यांकडे कशा घेऊन जातात हे अधोरेखित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या