Video – आजच्याच दिवशी गांगुली-द्रविडने श्रीलंकेचा पालापाचोळा करत रचला होता विक्रम

1529

टीम इंडियाचा ‘दादा’ सौरव गांगुली आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी बरोबर 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अविस्मरणीय खेळी करत जागतिक विक्रम रचला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या सातव्या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन आशियाई देशात 26 मे, 1999 ला सामना रंगला होता. या लढतीत हिंदुस्थानचे नेतृत्व करत होता मोहम्मद अझरूद्दीन तर श्रीलंकेची धुरा अर्जुना रणतुंगा याच्या खांद्यावर होती. या लढतीत गांगुली आणि द्रविड यांनी 318 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती.

दोन्ही संघासाठी महत्वाच्या अशा या लढतीत श्रीलंकेचा कर्णधार अर्जुना रणतुंगा याने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. सदागोपन रमेशच्या रूपाने हिंदुस्थानचा पहिला फलंदाज झटपट बाद झाला. त्यावेळी धावफलकावर फक्त 6 धावा होत्या. 1 बाद 6 अशा स्थितीत असताना वन डाऊन आलेल्या राहुल द्रविड आणि सलामीवीर सौरव गांगुली यांनी धावांचा पाऊस पाडत 318 धावांची भागीदारी केली, व एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला.

श्रीलंकेविरुध्दच्या या लढतीत गांगुलीने 158 चेंडूचा सामना करताना 183 धावा केल्या. यात त्याच्या 17 चौकार व 7 षटकार यांचा समावेश होता. तर द्रविडने 129 चेंडूचा सामना करताना 145 धावा चोपल्या. यादरम्यान त्याने 16 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या दोघांच्या दणदणीत फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने 6 बाद 373 धावांचा डोंगर उभारला. त्यांनंतर श्रीलंकेला अवघ्या 216 धावात गारद करत हिंदुस्थानने 157 धावांनी मोठा विजय मिळवला. याच लढतीत गोलंदाजीमध्ये रॉबिनसिंगने बळीचा ‘पंच’ लगावला होता.

पहा व्हिडिओ –

आपली प्रतिक्रिया द्या