दादाचे आयपीएलमध्ये पुनरागमन! दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुनरागमन केले आहे. दादा दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला असून त्याला फ्रेंचायझीने ‘क्रिकेट संचालक’ बनविले आहे. खरं तर गांगुलीने याआधीच दिल्ली कॅपिटल्सचे काम सुरू केले आहे. सध्या सुरू असलेल्या दिल्ली संघाच्या प्रशिक्षण शिबिरातही तो उपस्थित असतो. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने त्याला गुरुवारी अधिकृतपणे ‘क्रिकेट संचालक’ पदाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल 2019 मध्ये सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक होता.

आपल्या या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाला, मी दिल्ली कॅपिटल्समध्ये परतण्यास उत्सुक आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवेगळ्या संघांशी संबंधित आहे. प्रिटोरिया कॅपिटल्समध्ये दिल्ली फ्रेंचायझी महिला संघासोबत माझा चांगला प्रवास झाला. आता मी आयपीएलच्या आगामी हंगामाची वाट बघतोय. माझ्या शेवटच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्सने संघ म्हणून चांगली कामगिरी केली. यावेळीही आम्ही व्यवस्थित मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

सौरव गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी केली होती. हा संघ गुणतालिकेत तिसऱया क्रमांकावर होता. यानंतर एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्सचा पराभव करून दिल्लीने क्वॉलिफायर-2मध्ये प्रवेश केला होता. मात्र, क्वॉलिफायनर-2 लढतीत चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभूत झाल्याने दिल्लीचे आयपीएलची फायनल गाण्याचे स्वप्न भंगले होते.

डेव्हिड वॉर्नर दिल्लीचा नवा कर्णधार!
कार अपघातात जायबंदी झालेल्या रिषभ पंतच्या गैरहजेरीत यंदाच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरची कर्णधार म्हणून निवड केली आहे. डेव्हिड वॉर्नरने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादला चॅम्पियन बनवले होते. तो आयपीएलमधला सर्वात यशस्वी परदेशी फलंदाज होय. अक्षर पटेलकडे या संघाने उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.