‘दादा’गिरी! गांगुलीच्या झंझावाती कारकिर्दीवर एक नजर…

3072

‘बंगालचा टायगर’, ‘दादा’ अशा टोपण नावाने प्रसिद्ध असणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं देण्यात आली आहे. बुधवारी त्याने अधिकृतपणे अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला. बीसीसाआयचा अध्यक्षपदासाठी 10 महिन्यांचा कार्यकाळ त्याला मिळेल.

मैदान गाजवल्यानंतरही गांगुली क्रिकेटशी जोडला गेलेला आहे. क्रिकेट समालोचन असो किंवा संघटनेचे अध्यक्षपद, गांगुलीने आपली वेगळी छाप सोडली आहे. आता तो बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याने आता इथेही आपले कौशल्य वापरून तो टीम इंडियाला आणखी नव्या उंचीवर नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करताना दिसेल.

90 च्या दशकात हिंदुस्थान आणि जागतिक क्रिकेटला फिक्सिंगचा विळखा पडला होता. हिंदुस्थानचा संघ तेव्हा देशात आणि विदेशातही गटांगळ्या खात होता. त्यावेळी गांगुलीच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली. गांगुली कर्णधार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे ‘सोनियाचे दिवस’ सुरू झाले. त्याच्या कारकिर्दीवर थोडक्यात नजर टाकूया…

– गांगुलीने 1 जानेवारी 1992 रोजी विसाव्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु या लढतीत त्याला फक्त 3 धावा करता आल्या.

– पहिल्याच लढतीत अपयश मिळाल्याने पुढील जवळपास 4 वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दुरावला होता.

sourav-ganguly5

– 1996 ला त्याला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत खेळण्याची पुन्हा संधी मिळाली. या मालिकेत त्याने लागोपाठ शतक ठोकले. तेव्हापासून त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

– 2000 च्या दरम्यान गांगुलीच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. या नंतर त्याने संघाची नव्याने बांधणी केली आणि टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक बनला.

sourav-ganguly1

– 2002 मध्ये नॅटवेस्ट सिरीजदरम्यान लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्याने शर्ट उतरवून केलेले खास सेलिब्रेशन आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

– 2003 ला गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव झाल्याने टीम इंडियाला उपविजेतेदावर समाधान मानावे लागले.

2003-wc

– गांगुलीने 113 कसोटीमध्ये 7212 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 16 शतकांचा आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

– तर 331 एकदिवसीय लढतीत त्याने 11, 363 धावा केल्या असून यात त्याच्या 22 शतकांचा आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे.

sourav-ganguly3

– गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 49 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 21 सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला. 13 सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. तर 15 सामने अनिर्णित राहिले.

– त्याच्याच नेतृत्वाखालील 146 सामन्यांपैकी 76 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. 65 सामने गमावले तर 5 सामने अनिर्णित राहिले.

sourav-ganguly4

– सलग चार एकदिवसीय लढतीत ‘सामनावीर’चा पुरस्कार पटकावणारा एकमेव खेळाडू गांगुली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत 10 हजार धावा, 100 बळी आणि 100 झेल घेणाऱ्या अनोख्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होतो.

– आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर त्याने आयपीएल मध्ये हात आजमावला. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स संघाचे नेतृत्व केले.

sourav-ganguly2

आपली प्रतिक्रिया द्या