सौरव गांगुलीच्या BCCI च्या अध्यक्षपदाबाबत पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार सौरभ गांगुली ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदावर विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर ‘दादा’ क्रिकेटपटूवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. याच दरम्यान बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्थानी क्रिकेटसाठी शुभसंकेत! सौरभ गांगुलीवर अभिनंदनाचा वर्षाव

शरद पवार म्हणाले की, ‘बीसीसीआयची जबाबदारी एका क्रिकेटपटूकडे गेल्याचे मला समाधान वाटत आहे. सौरव गांगुली हा गेली 4 ते 5 वर्षे पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे क्रिकेटपटू आणि प्रशासकीय कामकाज असा दोन्ही प्रकारचा अनुभव आहे. त्यामुळे तो बीसीसीआयचा कारभार सक्षमपणे सांभाळू शकतो. त्याच्या कार्यकाळात टीम इंडिया अधिकाधिक चांगली कामगिरी करेल.’

23 ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभा
दरम्यान, बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली याने नामांकन दाखल केले आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बीसीसीआयची 23 ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. तसेच बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याचा अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

गांगुलीचे 7 कोटींचे नुकसान होणार
सौरभ गांगुली 23 ऑक्टोबरला हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदीची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झालाय, मात्र अध्यक्षपदी येताच गांगुलीचे कमीत कमी सात कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. कारण 47 वर्षीय गांगुली सध्या समालोचन आणि व्यावसायिक जाहीरातीही करतो, मात्र अध्यक्षपदी विराजमान होताच त्याचे हे करार संपुष्टात येणार आहेत. याचबरोबर ‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल संघालाही तो सेवा देऊ शकणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या