बीसीसीआयच्या अध्यक्षपदानंतर ‘दादा’ राजकारणात प्रवेश करणार?

284

बीसीसीयच्या अध्यक्षपदासाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने नामांकन दाखल केले आहे. त्याची बिनविरोध निवड होणे, निश्चित मानले जात आहे. अध्यक्षपदाचा 10 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ‘दादा’ राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सौरभ गांगुली भाजपचा चेहरा असेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फक्त 10 महिन्यांसाठी गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद स्विकारण्यास तयार झाल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बीसीसीआयचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर सौरभ गांगुलीला क्रिकेट समालोचन आणि प्रसारमाध्यमांशी करार करता येणार नाही. त्यामुळे त्यांचे सात कोटींचे नुकसान होणार आहे. तसेच टिम इंडियाचे प्रशिक्षकपद मिळावे अशी त्याची इच्छा होती. अनेकदा त्याने ती व्यक्तही केली होती. मात्र, अध्यक्षपद स्विकारल्यानंतर या पदापासून तो दूर जाणार आहे. त्यामुळे एवढे नुकसान होत असतानाही सौरभने फक्त 10 महिन्यांसाठी अध्यक्षपद स्विकारण्याची तयारी दाखवल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांसाठी सौरभ गांगुली भाजपचा चेहरा बनण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सौरभचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा 10 महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी सौरभ भाजपचा चेहरा असेल असे सांगण्यात येत आहे. मात्र, आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्यांच्या संपर्कात नाही. तसेच सध्या राजकारण प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे सौरभने स्पष्ट केले आहे. मात्र, सौरभ गांगुलीने नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा, अनुराग ठाकूर आणि हेमंत विस्वा शर्मा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. सौरभला बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर, हेमंत विस्वा शर्मा यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शनिवारी सौरभने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने बीसीसीआयचे अध्यक्षपद त्यालाच मिळणार हे निश्चित झाले होते. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आणि सौरभला अध्यक्षपदासाठी भाजपने दिलेल्या पाठिंबा दिल्यामुळे त्याच्या राजकारण प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या