गांगुलींची तब्येत पुन्हा बिघडली, महिनाभरात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल

‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत मंगळवारी रात्री पुन्हा एकदा बिघडली. छातीत पुन्हा दुखू लागल्याने त्यांना बुधवारी कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधी, याच महिन्यात हृदयविकाराच्या सौम्य झटक्यामुळे गांगुलींना दक्षिण कोलकात्यातील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरीही गेले होते. मात्र, याच महिन्यात गांगुलींवर पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली.

मंगळवारी रात्री सौरव गांगुली यांच्या छातीत पुन्हा एकदा दुखू लागले. त्यांच्या छातीमध्ये दोन ब्लॉकेज असून, त्यावर नंतर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने गांगुलींना बुधवारी सकाळी तातडीने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गांगुलींची प्रकृती स्थिर असून, त्यांना आता बरं वाटत आहे. कुठलाही धोका नको म्हणून त्यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वी, 1 जानेवारीला व्यायाम करत असताना सौरव गांगुलींच्या डोळय़ांपुढे अंधारी आली होती. त्यानंतर त्यांना वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर गांगुलींना हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झाले. अँजिओप्लॅस्टीनंतर 7 जानेवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या