‘दादा’साठी ‘दीदीं’ची भलतीच घाई, निवड होण्यापूर्वीच म्हणाल्या ‘बधाई हो बधाई’

1271

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) पुढील अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. रविवारी बीसीसीआयची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये गांगुलीच्या नावावर मोहोर उमटवण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अद्याप बीसीसीआयने अधिकृतपणे याबाबत माहिती दिलेली नसली तरी गांगुलीला सोशल मीडियावर शुभेच्छा आणि अभिनंदन करणाऱ्यांची रीघ लागली आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील आघाडीवर आहे.

‘दादा’गिरी! सौरव गांगुलीच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेले क्षण

सौरव गांगुलीची याची बीसीसीआयच्या अध्यक्षतेपदी निवड होण्यापूर्वीच त्यांनी ‘निवड झाल्याबद्दल अभिनंदन’ असे ट्वीट केले आहे. सर्वानुमते बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरव गांगुली याचे खूप-खूप अभिनंदन. अध्यक्षतेच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा. हिंदुस्थान आणि बंगालसाठी हा गर्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. नवीन इनिंग देखील पूर्वीप्रमाणे शानदार असेल, असे ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केले.

दरम्यान, 47 वर्षीय सौरव गांगुली याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज दाखल केला. गांगुलीसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याने बीसीसीआयच्या सरचिटणीसपदासाठी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा छोटा भाऊ अरुण धुमल याने बीसीसीआयच्या कोषाध्यपदासाठी अर्ज केला आहे. 23 ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची आणि इतर सदस्यांची निवड होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या