…तरच महिलांचे आयपीएल खेळवता येईल! सौरभ गांगुलीने मांडले मनोगत

437

आपल्याला महिलांसाठी आयपीएल खेळवायचे असेल तर त्यासाठी किमान 160 महिला क्रिकेटपटूंचा सहभाग हवा. तरच सात संघांची महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धा आपण खेळवू शकू असे मनोगत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केले आहे.

येत्या 4 वर्षांच्या काळात अशी स्पर्धा खेळवणे शक्य होईल आणि तेव्हाच महिलांसाठी 7 संघ सहभागी होतील, अशी आयपीएल स्पर्धा भरवता येईल. मात्र स्थानिक राज्य संस्थांनी आपल्या अंतर्गत खेळणाऱ्याी महिला क्रिकेटपटूंना अजून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्यावेळी महिला खेळाडूंची संख्या 150-160 च्या घरात पोहचले त्यावेळी ही स्पर्धा नक्कीच खेळवता येईल असे मत ‘इंडिया टुडे’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांगुली यांनी मांडले. हिंदुस्थानातील पुरुष आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या तुफान यशानंतर अशी स्पर्धा महिला खेळाडूंसाठीही खेळवली जावी अशी मागणी क्रिकेट क्षेत्रातून होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधले अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. मध्यंतरी महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवावी अशी मागणी चाहत्यांकडून होत होती. 2019 च्या हंगामात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठी 3 प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन केले होते मात्र त्यानंतर हा विषय पुन्हा मागे पडला. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी महिला क्रिकेट आयपीएलबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

19 डिसेंबरला होणार आयपीएल लिलावातील बोली
2020च्या आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठीच्या ट्रान्स्फर विंडो आता बंद झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंचे एका संघाकडून दुसऱ्या संघांकडील हस्तांतरण थांबले आहे. त्यानंतर आता खेळाडूंच्या लिलावावरील बोली येत्या 19 डिसेंबरला पुकारल्या जाणार आहेत. त्यामुळे 19 तारखेला कोणत्या खेळाडूवर किती रुपयांची बोली लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या