ते आले, भेटले अन् पहिल्या नजरेत प्रेमात पडले, 29 वर्षीय तरुणीचे 80 वर्षीय वृद्धासोबत लग्न

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं…’, ‘प्रेम खरं असेल तर वय पाहिलं जात नाही…’, ‘पहिली नजर में पहला प्यार…’ या सर्व कवी कल्पना. मात्र कधी-कधी या सत्यातही उतरतात आणि असंच घडलं आहे ते दक्षिण आफ्रिका देशातील केपटाऊन या शहरात. येथे एका 29 वर्षीय तरुणीचा 80 वर्षाच्या वृद्धावर जीव जडला आणि दोघांनी लग्नही केलं. ‘ब्रेकिंग टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, केपटाऊन शहरात राहणाऱ्या 29 वर्षीय तेरजेल रासमूस या पत्रकार व कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे पहिल्याच नजरेत 80 वर्षीय विल्सन रामसूस यांच्यावर प्रेम जडले. दोघांच्या वयामध्ये 51 वर्षांचे अंतर असले तरी आम्ही एकमेकांना पूरक आहोत, असे तेरजेल म्हणते. विल्सन यांच्या मुलांची वय देखील तेरजेलपेक्षा अधिक आहे. असे असतानाही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात उतरवलाही.

south-africa-girl

याबाबत बोलताना तेरजेलने सांगितले की, आमच्या या अनोख्या प्रेम कथेची सुरुवात 2016 ला झाली. आम्ही दोघे एका स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. मी त्या ठिकाणी फोटो घेण्याचे काम करत होते. काम झाल्यानंतर तिथे सुरू असलेला नाच-गाण्याचा कार्यक्रम पाहात बसलेली असताना अचानक विल्सन आले आणि त्यांनी माझ्याशेजारी बसू शकतो का असे विचारले. याचवेळी पहिल्याच नजरेत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आमच्या भेटी-गाठी सुरू झाल्या.

south-africa-girl-2

पहिल्या भेटीनंतर तीन महिन्यांनी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेरजेलची आई आणि विल्सनच्या मुलांनीही यावर आक्षेप घेतला नाही, यामुळे दोघांचे प्रेम अधिकच फुलले. या अनोख्या लग्नाला विल्सनची 56 वर्षीय मुलगीही उपस्थित होती. लग्नानंतर दोघेही एकमेकांची काळजी घेत असून तेरजेलच्या पुढील शिक्षणासाठी विल्सन आर्थिक मदतही करत आहेत.

south-africa-girl-3

दरम्यान, विल्सन यांच्या पत्नीचे 2002 ला निधन झाले होते. तेव्हापासून ते एकटेच राहात होते. आता त्यांच्या जीवनात 29 वर्षीय तेरजेल आली असून आम्ही दोघेही एकमेकांना पूरक आहोत, असे तेरजेल म्हणाली. माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा पती विल्सनने माझी खूप मदत केली. मला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच काही निर्णय घेताना ते मला सल्लाही देतात आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही करत आहेत, असेही तिने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या