…तर दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कपला मुकणार, सरकारच्या हस्तक्षेपामुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेवर बंदीचे संकट

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (सीएसए) कारभारात सरकारी हस्तक्षेप वाढल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) त्यांच्यावर कारवाई करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. या प्रकरणात लवकर काही तोडगा निघाला नाही तर येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानात होणाऱया टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला सहभागी होता येणार नाही.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीएन एल्गर, मर्यादित षटकाचा कर्णधार तेम्बा बावुमा आणि महिला संघाची कर्णधार डॅन वॅन यांना सीएसए प्रशासनामुळे निलंबनाची भीती वाटत आहे. क्रिकेट प्रशासनात सरकारच्या हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या वर्षी होणाऱया टी-20 वर्ल्ड कपआधी संघावर निलंबनाची कारवाई करू शकते अशी मत या कर्णधारांनी व्यक्त केले. सीएसएवर कारवाई करण्यासंदर्भातील एका संयुक्त पत्रकावर आफ्रिकेच्या तिन्ही कर्णधारांनी स्वाक्षरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट प्रशासनावरील हे संकट गेल्या 18 महिन्यांपासून सुरू आहे. क्रीडा मंत्रालय यात अधिकृतपणे हस्तक्षेप करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी क्रीडामंत्र्यांनी खूप संयम ठेवला आहे. सरकारने क्रीडा क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ते किती टोकाचे असतील याची आम्हाला कल्पना नाही. आयसीसीकडून सीएसएवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे दक्षिण आफ्रिका संघांच्या तिन्ही कर्णधारांनी स्वाक्षरी केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे.

महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने संघाची व्यवस्थित मोर्चेबांधणी करून गेल्या 14 महिन्यांत मोठे यश मिळवले आहे. पुरुष संघ टी-20 वर्ल्ड कपची तयारी करत आहे, पण सध्याचे प्रशासन या प्रयत्नांना खोडा घालण्याचे काम करत आहे. हे असेच सुरू राहिले तर आम्हाला आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून निलंबित केले जाऊ शकते, अशी भीतीही संयुक्त पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या