बीडच्या भूमिपुत्राने दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर अ‍ॅकान्कागुआवर फडकवला तिरंगा

621

बीड जिल्ह्यातील चौसाळ्यापासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर असणार्‍या हिंगणी (बु.) येथील भुमिपुत्र आणि व्यवसायानिमित्त ठाण्यात स्थायिक असलेले शरद दिनकरराव कुलकर्णी यांनी प्रजासत्ताकदिनी अमेरिकेतील सर्वात उंच असणार्‍या अ‍ॅकान्कागुआ शिखरावर तिरंगा फडकवला. वयाच्या 57 व्या वर्षी असा विक्रम करणारे शरद कुलकर्णी हे पहिले हिंदुस्थानी गिर्यारोहक ठरले आहेत. आपल्या संपूर्ण प्रवासाबाबत सोमवारी त्यांनी बीडमध्ये सविस्तर माहिती दिली.

शरद कुलकर्णी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मी आणि माझी पत्नी अंजली कुलकर्णी यांनी एक निश्‍चय केला होता की, जगातील सात खंडातील सर्वात उंच असणारी सात शिखरे पादाक्रांत करायची. यातील तीन शिखरे आम्ही पादाक्रांत केली. गेल्यावर्षी 22 मे रोजी हिंदुस्थानातील सर्वात उंच असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून परत येत असतानाच गिर्यारोहकांची अचानक झालेली गर्दी, त्यामुळे झालेला विलंब आणि ऑक्सीजनची कमतरता या अनेक कारणामुळे माझी पत्नी अंजली हिचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुःखातून बाहेर येत खचून न जाता आमचे उरलेले स्वप्न पूर्ण करण्याचे मी ठरवले. अवघ्या आठ महिन्यांच्या अंतराने अमेरिकेतील 6 हजार 993 मीटर (जवळपास 23 हजार फूट) उंचीवर असणारे अ‍ॅकान्कागुआ शिखर सर केले. पत्नी अंजलीचे राहिलेले अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकून राहिलेली दोन्ही शिखरे सर करुन अंजलीला श्रध्दाजंली अर्पण करण्याचे ठरवले आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, अमेरिकेतील अ‍ॅकान्कागुआ हे शिखर सर करण्यासाठी आमची सहकार्‍यांसोबतची मोहिम 6 जानेवारी 2020 रोजी सुरु झाली. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी राष्ट्रीय ध्वज देवून आमच्या टिमला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आम्ही दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिना येथे जाऊन प्रजासत्ताकदिनी अमेरिकेतील अ‍ॅकान्कागुआ या सर्वात उंच असणार्‍या शिखरावर चढाईची मोहिम फत्ते करुन तिरंगा तिथे फडकावत राष्ट्रगीत म्हटले. वयाच्या 57 व्या वर्षी असा विश्‍वविक्रम करणाऱ्या जेष्ठ हिंदुस्थानी गिर्यारोहकाचा मानही यानिमित्ताने मिळाल्याचे कुलकर्णी म्हणाले. पत्नीच्या निधनानंतर आम्ही पाहिलेल्या स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण झाले. मात्र, आणखी दोन शिखरे (उत्तर अमेरिकेतील ‘ देनाली ‘ आणि अंटाट्रीकातील माऊंट ‘विल्सन ‘) सर करायची बाकी आहेत. आणि त्यासाठी जूनमध्ये मी रवाना होत आहे, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी व माझी पत्नी अंजलीने आफ्रिकेतील किलीमंजारो, रशियातील एलब्रुस, आस्ट्रेलियातील कोझीओस्को ही चार शिखरे यशस्वीरित्या सर केली आहेत. याशिवाय नेपाळमधील माऊंटलोबूचे, माऊंटमेरा ही शिखरेही काबीज केली आहेत. आस्ट्रेलियातील ऑसिटेन चॅलेंज 10 या शिखरांवर हिंदुस्थानचा झेंडा फडकावणारे पहिले जेष्ठ जोडपे आणि हिंदुस्थानातील पाहिली टीम याचा मानही आम्हा दाम्पत्याला मिळाला होता आणि त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण झाली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

आपली प्रतिक्रिया द्या