हिंदुस्थानची सलामी बांगलादेशशी, 5 संघांमध्ये जेतेपदाची झुंज

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप (सॅफ) या स्पर्धेचा बिगूल दणक्यात वाजला. 1 ऑक्टोबरपासून मालदिव येथे या स्पर्धेला सुरुवात होणार असून यात पाच संघांमध्ये जेतेपदाची चुरस लागणार आहे. हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक आयगोर स्टायमॅक यांनी 23 जणांच्या चमूची घोषणा रविवारी केली. मधल्या फळीतील खेळाडू उदांता सिंग याचे हिंदुस्थानी संघात पुनरागमन झाले आहे. हिंदुस्थानसह या स्पर्धेमध्ये यजमान मालदीव, बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ या देशांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा सलामीचा सामना 4 ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी होणार आहे. हिंदुस्थानचा चमू सोमवारी बंगळुरूला एकत्र आला असून उद्या (मंगळवारी) मालदिवला रवाना होणार आहे.

सात वेळा चॅम्पियनचा मान

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपला 1993 साली सुरुवात झाली. हिंदुस्थानी फुटबॉल संघाने या स्पर्धेची सर्वाधिक सात विजेतेपदे पटकाविली आहेत. हिंदुस्थानने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011 व 2015 या सालांमध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला आहे. 2018 साली झालेल्या या स्पर्धेत मालदीवने अजिंक्य पदाला गवसणी घातली.

हिंदुस्थानी संघाच्या लढती खालीलप्रमाणे

  • 4 ऑक्टोबर – बांगलादेश (संध्याकाळी 4.30 वाजता)
  • 7 ऑक्टोबर – श्रीलंका (संध्याकाळी 4.30 वाजता)
  • 10 ऑक्टोबर – नेपाळ (रात्री 8.30 वाजता)
  • 13 ऑक्टोबर – मालदिव (रात्री 8.30 वाजता)

हिंदुस्थानचा 23 जणांचा चमू

  • गोलकिपर – गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, विशाल वैथ.
  • बचावपटू – प्रीतम कोटल, सेरीटोन फर्नांडिस, चिंगलसना सिंग, राहुल भेके, सुभाशीष बोस, मंदार देसाई.
  • मधली फळी – उदांता सिंग, ब्रॅन्डन फर्नांडिस, लालेंगमाविया, अनिरुद्ध थापा, साहल अब्दुल
  • सामद, जिक्सन सिंग, ग्लेन मार्टीन्स, सुरेश सिंग, लिस्टन कोलॅको, यासीर मोहम्मद.
  • आक्रमक फळी – मानवीर सिंग, रहीम अली, सुनील छेत्री, फारूख चौधरी.
आपली प्रतिक्रिया द्या