‘टक्कल’ बनला राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा मुद्दा, ‘केसवंत’ होण्यासाठी धोरण बनविण्याचे आश्वासन

दक्षिण कोरियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ‘ली जे म्युंग’ हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून त्यांनी केसगळती रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या या भूमिकेला टक्कल पडलेल्या किंवा पूर्ण चमनगोटा होण्याच्या मार्गावर असलेल्या नागरिकांनी जबरदस्त पाठिंबा दिला आहे. यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत टक्कल हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्युंग म्हणाले की ‘टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्यावर पुन्हा घनदाट केस उगवावेत यासाठीचे उपचार राष्ट्रीय आरोग्य विमा कार्यक्रमात समाविष्ट केले पाहिजेत’. यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट प्रसिद्ध करत म्हटले की ‘टक्कल असलेल्या लोकांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवावेत यासाठी मी एक उत्तम धोरण तयार करेन.”

आण्विक सज्जता, अमेरिकेशी संबंध, आर्थिक घोटाळे या सारखे मुद्दा आतापर्यंत दक्षिण कोरियाच्या राजकारणात प्रामुख्याने चर्चिले जात होते. बदलत्या काळानुसार तिथले निवडणुकीचे मुद्देही बदलायला लागले असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टक्कल पडलेल्या लोकांना म्युंग यांनी मांडलेला मुद्दा भलताच आवडला आहे. मात्र एक वर्ग असाही आहे, ज्याला हा मुद्दा पटला नसून त्यांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे. सत्तारुढ पक्षाच्या उमेदवाराने सवंग लोकप्रियतेसाठी हा मुद्दा पुढे केल्याचा आरोप या टीकाकारांनी केला आहे. दक्षिण कोरियातील लोकांमध्ये केस गळण्याचं प्रमाण हे बरंच आहे. दर पाचातील एक व्यक्ती ही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहे. टक्कल असलेल्यांची आणि टकले होण्याच्या मार्गावर असलेल्यांची संख्या मोठी असल्यानेच म्युंग यांची मागणी अनेकांना भावताना दिसते आहे.