दक्षिण कोरियातील मार्शल लॉ सहा तासांत मागे

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी देशभराल मार्शल लॉ लागू करण्याची अचानक घोषणा केल्यानंतर देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले. यून येओल यांच्याच पक्षातील आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी मार्शल लॉ लागू करण्याला कडाडून विरोध केला. अखेर सहा तासांच्या तणावानंतर यून येओल यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राष्ट्राध्यक्षांनीच मार्शल लॉ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. यून योल यांनी विरोधी पक्षाकडून सरकार दुर्बल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. मार्शल लॉ लागू केल्याच्या घोषणेनंतर संसदेबाहेर बारा हजारांहून अधिक नागरिक जमले. संसदेला घेराव घालण्यात आला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी बॅरिकेडींग तोडून संसद परिसरात प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्राध्यक्षांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाल्याने त्यांनी मार्शल लॉ लावल्याची चर्चा आहे.