साऊथच्या ‘मास्टर’स्ट्रोकने वाढल्या बॉलिवूडच्या आशा!, हिंदीतील बिग बजेट चित्रपट आता रिलीजच्या तयारीत

साऊथच्या ‘मास्टर’ या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये शानदार एंट्री केली आहे. लॉकडाऊननंतर 100 कोटींचे कलेक्शन करणारा आणि घवघवीत व्यावसायिक यश मिळवणारा हा पहिलाच चित्रपट ठरलाय. साऊथच्या या मास्टरस्ट्रोकमुळे निश्चितच आता बॉलीवूडकरांच्या आशा वाढल्या असून येत्या काही दिवसांत बॉलीवूडचे रखडलेले बिग बजेट चित्रपटही रिलीज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये बंद असलेले थिएटर तब्बल नऊ महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाले. ओटीटीने निर्माण केलेले आव्हान आणि त्यातच 50 टक्के प्रेक्षकांची अट असल्याने अजूनही तुरळक प्रेक्षकच थिएटरकडे वळताना दिसले. नुकसान होईल या भीतीपोटी बॉलीवूडचे बडे निर्मातेदेखील आपले चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत नाहीत. परिणामी थिएटर सुरू होऊन तीन महिने झाले तरी एकही बिग बजेट चित्रपट रिलीज झाला नाही. ‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ या चित्रपटांकडून थिएटरमालकांना सुरुवातीपासूनच खूप आशा आहेत. मात्र यादेखील चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे साऊथच्या ‘मास्टर’ या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचा विषय दमदार असेल आणि त्यात आपले आवडते कलाकार असतील तर प्रेक्षक थिएटरकडे वळणार हे या चित्रपटाने सर्वांना दाखवून दिले आहे. त्यातच नुकतीच देशभरात लसीकरणालादेखील सुरुवात झाल्याने लोकांमधली कोरोनाची भीतीदेखील नाहीशी होत आहे. त्यामुळे बॉलिवूड निर्मातेदेखील चित्रपट रिलिजसाठी आता उत्सुक असल्याचे दिसतेय.

हॉलीवूडनेही केली बक्कळ कमाई

कोरोनानंतर केवळ साऊथच नाही तर हॉलीवूडच्या चित्रपटांनीदेखील बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी केली आहे. कोरोनानंतर हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीला उभारी देण्यात हॉलीवूडचादेखील मोठा वाटा आहे. थिएटर सुरू झाल्यानंतर रिलीज झालेल्या ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन 1984’ या चित्रपटांनी हिंदुस्थानातील बॉक्स ऑफिसवर अनुक्रमे 13 कोटी आणि 16 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या