साथिया तुने क्या किया?

सुरांचा राजा एस.पी. बालसुब्रमण्यम शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले आणि अवघे संगीत रसिक शोकसागरात बुडाले. एस.पी. यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे 5 ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार दिसत होते. योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी ही माहिती दिली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

40 हजार गाण्यांचा विक्रम

तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम बालसुब्रमण्यम यांच्या नावावर आहे. एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी त्यांनी 12 तासांमध्ये 21 गाणी स्करबद्ध केली. यासाठी त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले. अशाप्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आले आहे.

  • एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झाला. 15 डिसेंबर 1966 रोजी त्यांनी ‘श्री श्री श्री मर्यादा रामण्णा’ या तेलगू चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं. 1969 मध्ये त्यांना पहिलं तामिळ गाणे रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संवराभारनाम’ या चित्रपटातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे कळून पाहिले नाही. पुढे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीकडे मोर्चा वळवला.
  • हळुवार पण थेट काळजाला हात आवाज ही एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाची वैशिष्टय़े होती. प्रत्येक गाणं ते गुणगुणायला भाग पाडायचे. हिंदीमध्ये जसे किशोर कुमार यांचे युग सुरू झाले, तसं दक्षिणेत बालसुब्रमण्य युग होते. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि बालसुब्रमण्यम जोडी जमली होती. मात्र देशविदेशात त्यांचे नाव पोचले, ते 90 च्या दशकात. बॉलीवूडमध्ये अभिनेता सलमान खान याचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. ‘एक तुजे के लिये’ या सिनेमातील त्यांची गाणी खूपच गाजली. त्यानंतर सलमानच्या बागी, मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केले. ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील ‘दिल दिवाना’ या गाण्यासाठी त्यांनी फिल्मफेयर ऍकॉर्ड मिळाले. अनेक पुरस्कार त्यांच्या काटय़ाला आले. एसपी यांनी डबिंगआर्टिस्ट म्हणूनही काम केले.
  • 1992 मध्ये बालसुब्रमण्यम यांनी ए.आर.रेहमान यांच्यासोबत ‘रोजा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. बालसुब्रमण्यम हे उत्कृष्ट गायक तर होतेच. परंतु याव्यतिरिक्त त्यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतील 40 पेक्षा अधिक चित्रपटांना संगीतही दिलं होतं.
  • 15 वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी 2013 मध्ये गायक म्हणून ‘चेन्नई एक्प्रेस’ या चित्रपटातील गाणं स्वरबद्ध केले.

अभिनयाची उत्तम जाण

सुब्रमण्यम जेव्हा 90 च्या दशकात सलमान खानचा आकाज म्हणून ओळखले जायचे तेव्हा त्यांनी यातून ब्रेक घेतला. त्यांना पूर्णवेळ अभिनेता होण्याचीही इच्छा होती. त्यांनी 72 चित्रपटांमध्ये अभिनयही साकारला होता. एसपी यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. ‘हमसे है मुकाबला’ या चित्रपटात त्यांनी प्रभुदेवाच्या भावाची भूमिका केली.

दबंग सलमान झाला भावुक!

‘आवाजाचा जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानदेखील भावुक झाला असून या घटनेने मन हेलावल्याची प्रतिक्रिया त्याने ट्विटरवरून दिली आहे. ‘सलमानचा आवाज’ म्हणून नक्कदीच्या दशकात बालसुब्रमण्यम यांच्याकडे पाहिले जायचे. सलमानच्या बॉलीवूड करिअरच्या सुरूवातीला अनेक चित्रपटांत त्यांनीच पार्श्वगायन केले होते. ‘मैने प्यार किया’ चित्रपटात त्यांनी गायलेली ‘आते जाते’, ‘कबुतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, ‘मेरे रंगमे रंगने वाली’ ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील ’दिल दिवाना’ या गाण्यासाठी तसेच ‘हम आपके है कौन’ मधील ‘दीदी तेरा देवर दिवाना’साठी त्यांनी फिल्मफेयर पटकावला होता. सलमानच्या ‘पत्थर के फूल’, ‘लक’, ‘साजन’, ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले होते. ‘बालासुब्रमण्यम यांच्या निधनाच्या वृत्ताने मन हेलावले आहे. संगीत क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना,’ असे ट्विट सलमानने केले आहे.

बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने हिंदुस्थानी संगीताने आपला मधुर सूर गमावला आहे. अनेक चाहते त्यांना ‘पादुम नीला’ म्हणजे सिंगींग मून असे म्हणणात. बालसुब्रमण्यम यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांचा सुमधुर आवाज आणि संगीताने संगीतरसिकांना अनेक दशके मंत्रमुग्ध केले. बालसुब्रमण्यम यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

प्रतिभावंत गायक, मधुरभाषी आणि उत्तम व्यक्ती एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार व्यथित झाले आहे. आम्ही दोघांनी अनेक गाणी एकत्र गायली, गाण्याचे अनेक शो केले. आज ते सगळं आठवतंय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. – लता मंगेशकर, गानसम्राज्ञी

एस. पी. बालसुब्रमण्यम यांची बातमी ऐकून दु:खी झालेय. एसपी खूप अचंबित करणारे, चतुरस्र कलावंत होते. ते जेव्हा हिंदीत आले, तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी पहिलं गाणं गायलं. ते अतिशय कमाल आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात कधीही भरून येणार नाही, अशी पोकळी निर्माण झालेय. – आशा भोसले, ज्येष्ठ पार्श्वगायिका

काय चाललंय ते कळतं नाही. देव किती अंत बघतोय. हिंदी सिनेसृष्टीत मोहमद रफी यांनी जसं हरहुन्नरी गीतगायन केलं, तसंच एसपींनी केलं. एसपी गाणे अक्षरश: जगले. त्यांच्या जाण्याने किती दु:ख झालेय, ते शब्दांत सांगता येणार नाही. – सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायक

आपली प्रतिक्रिया द्या