SP कोण आहे ? अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या चिठ्ठीत उल्लेख

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची माफी मागितली. माफी मागण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी अशोक गेहलोत यांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचा फोटो लीक झाला आहे. या फोटोमध्ये सांकेतिक भाषेतील काही वाक्ये आहेत, ज्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्तीत होते, मात्र ते अध्यक्ष झाले तर त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडावे लागणार होते. त्यांच्या 82 समर्थक आमदारांनी गेहलोत यांच्याऐवजी सचिन पायलट मुख्यमंत्री झाले तर आम्ही ते सहन करणार नाही असे म्हणत आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांना देऊ केले होते. या बंडामागे गेहलोत यांचाच हात असावा असा कयाल बांधला जात असल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाले होते. यामुळे गेहलोत यांना सोनिया गांधी यांची माफी मागावी लागली होती. या प्रकारामुळे गेहलोत यांनी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.

गेहलोत यांची जी चिठ्ठी लीक झाली आहे त्यामध्ये “एसपी पक्ष सोडणार आहे” (SP WILL LEAVE PARTY ) असे लिहिले होते. आता हा एसपी म्हणजे कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो मल्याळम मनोरमाचे छायाचित्रकार सुरेश जयप्रकाश यांनी टीपला होता. ज्या चिठ्ठीचा त्यांनी फोटो टीपला आहे ती चिठ्ठी गेहलोत यांची होती. गेहलोत यांनी त्यांच्या बचावासाठीचे सगळे मुद्दे या चिठ्ठीत लिहून आणले होते.

या चिठ्ठीमध्ये आणखी एक उल्लेख आहे ज्यात म्हटलंय की ‘पहला प्रदेश अध्यक्ष जिसने सरकार गिराने की पूरी कोशिश की’ तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे 102 विरूद्ध एसपी अधिक 18. त्यांच्या या तीन मुद्द्यांवरून त्यांचा रोख हा सचिन पायलट यांच्याकडे असावा असा अंदाज बांधला जात आहे. गेहलोत यांच्या या चिठ्ठीचा फोटो ट्विटरवर शेअर करत भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी “काँग्रेस जोडो..भारत जुडा हुआ है जी”अशी खोचक टीका काँग्रेसवर केली आहे.