तिसरे महायुद्ध अंतराळात

70

ज्ञानेश्वर भि. गावडे

धार्मिक वा सांस्कृतिक कारणावरून झालेल्या युद्धांचा अपवाद वगळता बरीचशी मोठी युद्धे त्या-त्या राष्ट्रांमधील आर्थिक कारणावरून झाल्याचा इतिहास आहे. जर जोरू, जंगल, जमीनजुमला यावरूनही काही जंग छेडली गेली आहेत. कोणत्याही देशाला स्वत:च्या भूमीवर लढाया करणे परवडत व आवडत नाही, तर दुस-या वा तिस-या राष्ट्रांच्या हद्दीत लढाया कराव्या लागतात. यावरून येथून पुढची महायुद्धे झालीच तर ती अंतराळामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण सध्या ‘स्पेस वेपन्स टेक्नोलॉजी’मध्ये अहमहमिकाच चालू आहे. म्हणून हिंदुस्थानने एप्रिल २००९ मध्ये आपला पहिला लष्करी रडार इमेजिंग सॅटेलाइट-२ (रिसेट-२) अवकाशात सोडला आणि ३० ऑगस्ट २०१३ रोजी फ्रेंच रॉकेट एरियनवरून ‘डेडिकेटेड लष्करी उपग्रह’ सोडला. अलीकडच्या काळात हिंदुस्थाननेदेखील एकामागोमाग एक उपग्रहांचे प्रक्षेपण अंतराळकक्षेत केलेले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच वेळी आपले शंभराहून अधिक उपग्रह सोडले होते आणि दोन दिवसांपूर्वी लष्करी उपयोगार्थ  उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. कार्टोसॅट-२ई उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता १३ झाली आहे. त्यामुळे शत्रूंच्या जमीन व समुद्रावरची टेहळणी करणे सोपे झालेले आहे. मानवाने अंतराळावर लक्ष केल्यामुळे सा-या जगभरची सुरक्षा बदलावी लागत आहे. आतापर्यंतची युद्धे जमीन, समुद्र व आकाश यामध्ये लढली गेली आहेत. महत्त्वाकांक्षी देशांना यानंतरची युद्धे बाह्य व सायबर अंतराळात खेळावयाची आहेत. त्यासाठी महासत्ता असलेल्या देशात आधुनिक युद्धशास्त्रात उपयोगी पडतील अशावर संशोधन सुरू झालेले आहे. अलीकडच्या पंचवीस वर्षांत बाह्य अंतराळाचे लष्करीकरण झाल्यामुळे स्पेस वेपन्स टेक्नॉलॉजीची स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यासाठी सोडलेले उपग्रह त्या त्या राष्ट्राचे हेर आहेत. ते हजारो फोटो घेऊन सर्व जगात कोण काय करीत आहे त्यावर लक्ष ठेवणे व त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करणे चालू ठेवण्याकरिता येते. त्यामुळे हिंदुस्थानने सोडलेल्या उपग्रहाद्वारे चीन व पाकिस्तान आपल्यापासून काहीही लपवू शकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या