ज्ञानदीप लावू जगी.. संत नामदेवांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख

 >> आसावरी जोशी 

आज कार्तिकी एकादशी.. आणि विठ्ठलपंतांच्या अतिप्रिय भक्ताची नामदेवबाबांची जयंती.. त्यानिमित्ताने नामदेवांच्या निरागस भक्तिभावात रंगून जाऊया..
  कीर्तन अखंड सुरु आहे.. विठूनामाचा जयघोष होतो आहे.. अवघ्या संतांचा मेळा पंढरीत एकवटला आहे.. संत नामदेवांच्या ओघवत्या रसाळ वाणीतून अखंड हरीनाम सुरु आहे.. विठ्ठलपंतही दंगून गेले आहेत आपल्या अत्यंत आवडत्या नामदेवाच्या शब्दांवर.. तालावर .. आणि निखळ.. निर्मळ.. निरपेक्ष.. निरागस.. भक्तिभावावर.. नामदेवबाबांचे कीर्तन.. त्यांच्या वाणीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश डोलू लागतो अजूनही.. आपले संत नामदेव पंजाब, राजस्थान या प्रांतात अतीव आदराने नामदेवबाबा म्हणून ओळखले जातात.. पंजाबात तर घुमान गावी नामदेवबाबांच्या शब्दाला अजूनही तितकाच मान आहे… त्यांचे अभंग आणि ग्रंथसाहेबमधील शबद एकमेकांच्या तालावर सुरेल नांदतात.. शीख बांधवांनी.. बाबांचे मंदिर उभारले आहे.. राजस्थानातही त्यांचे मंदिर आहे.. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीनंतर अविरत ५० वर्षे नामदेवबाबांनी भागवत धर्माचा संपूर्ण देशभर प्रसार केला.. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक भाषा आत्मसात केल्या.. खऱ्या अर्थाने ज्ञानियाचा वारसा संपूर्ण देशात नेला.. केशव कलाधारी, बहोरदास, लढविष्णू स्वामी हे बाबांचे पंजाबातील शिष्य.. महाराष्ट्रातील कीर्तन आणि ग्रंथसाहेबमधील शबद यांच्यात विलक्षण साम्य आहे..


मराठवाड्यातील हिंगोली गावात जन्मलेल्या नामदेवांचे अवघे बालपण विठुरायाच्या सहवासात.. पंढरपुरात गेले.. वडील दामाशेटी.. आई गोणाई.. कपडे शिवण्याचा पिढीजात व्यवसाय. पण छोट्या नामदेवाचे मन या व्यवसायात कधी रमलेच नाही.. घरी सुबत्ता.. पण वेळीच नामदेवाने घरच्या व्यवसायात लक्ष घालून सगळी घरची जबाबदारी घ्यावी ही सगळ्यांची रास्त अपेक्षा.. पण नामदेवांचा सारा ओढा विठुरायाकडे होता.. दामाजीशेट्टीचा रोजचा शिरस्ता होता, घरातील रोजची पूजा झाल्यानंतर ते मंदिरातील पांडुरंगाला स्वत: जाऊन नैवेद्य दाखवीत.. एक दिवस दामा शेटीनी ही जबाबदारी छोट्या नामदेवावर सोपविली.  नामदेव मोठ्या आनंदाने नैवेद्य घेऊन मंदिरात आले. पूजा केली, विठूरायाला मोठ्या भक्तिभावाने नैवेद्य दाखविला.. आणि समोर बसून राहिले. पण देव काही जगाचा ढिम्म हलेना.. नामदेवांनी देवाला पुन्हा प्रार्थना केली.. विनवले.. पण पांडुरंग मात्र डोळे मिटून उभाच.. नामदेवांनी सांगितले.. आता जर का तू नैवेद्य भक्षण नाही केलास तर मी इथून हलणार नाही.. तरी विठोबा काही हलेना.. शेवटी नामदेवांनी सांगितले आता जर का ही खीर तू खाल्ली नाहीस तर मी तुझ्यासमोर डोके आपटून प्राण देईन आणि आता नामदेव खरोखर डोकं आपटणार इतक्यात समोर देव प्रगटले.. आणि आनंदाने  खीर खाल्ली. या बालभक्ताने जेव्हा बोलायला सुरुवात केली ती विठ्ठल.. विठ्ठल.. या दोन शब्दांनी. त्या काळ्याशार परब्रम्हाला नामदेवांनी कधी मूर्ती मानलेच नाही.. ते विठ्ठलाला आनंदघन मानीत.. आणि तो सावळाही छोट्याशा टाळ.. चिपळ्याच्या तालावर डोलू लागे.. त्याच्या निरागस भक्तीत आकंठ तृप्तावत असे.. अत्यंत साजिरे नाते होते दोघांचे..  विठूराया या आपल्या छोट्याशा मित्राच्या सहवासात अगदी मन:पूर्वक रमत असे.. त्यामुळेच नामदेवांचे बालपण अनेक चमत्कारांनी भरलेले आहे.. अगदी आजच्या काळात हे चमत्कार आपण जरा बाजूला ठेवले तरीसुद्धा विठ्ठलपंत आणि नामदेवांच्या सुंदर, निर्मळ नात्याचे मनोज्ञ दर्शन येथे होते.. परमेश्वर आणि भक्त यातील नाते किती जवळकीचे आणि हक्काचे असावे.. याचे आदर्श उदाहरण.. आपल्या मनीचे सारे गुज नामदेव पांडुरंगास सांगत असत.. आपणच देव आणि आपणच नामदेव असे त्यांचे संभाषण चाले.. नामदेवांचे हे विठ्ठल वेड सुटावे म्हणून वयाच्या ११व्या वर्षी त्यांचे राजाईसोबत लग्न लावून देण्यात आले.. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल आणि लिंबाई अशी पाच मुले पदरी येऊनही व्यावहारिकदृष्ट्या नामदेवांनी फक्त विठ्ठलभक्तीच केली.. आई, वडील.. पत्नी.. पाच मुले.. दासी जनाबाई असा मोठा लवाजमा घरात होता.. पण त्यांचा हा गाडा विठ्ठलभक्तीच्या जोरावरच चालत राहिला.. विठ्ठल हेच त्यांच्या जगण्याचे सार होते..

घरच्यांच्या सततच्या तगाद्यामुळे एक दिवस नामदेव बाजारात कापड विकायला गेले. आणि वाटेतच एका दगडावर भजन करीत बसले.. आणि आपण कापड विकायला आलो आहोत  गोष्टीचा त्यांना अगदी विसर पडला.. संध्याकाळी नामदेव भानावर आले.. आता वडिलांचा ओरडा बसणार या भयाने त्यांनी ते कापड ते बसले होते त्या दगडालाच दुसऱ्या दगडाच्या साक्षीने विकले.. आणि ते मंदिरात जाऊन बसले. वडिलांना सर्व कळताच ते संतापले. नामदेवांनी मंदिरात जाऊन विठोबाला सर्व हकीकत सांगितली.. आणि वडिलांना सांगितले की साक्ष राहिलेला दगड घरातील एका खोलीत बंद करून ठेवला आहे. तेव्हा वडिलांनी जाऊन खोलीचे दार उघडताच त्यांना सोन्याची लड सापडली.. वडील आनंदले.. पण नामदेवांना विठूरायाची माया उमगली.. आणि ते सद्गदित झाले..

विसाव्या वर्षी नामदेवांची भेट अवघ्या संत मंडळींशी पंढरीत विठुरायाच्या साक्षीने झाली.. वय लहान असल्याने.. विठ्ठल पंतांचा वरद हस्त लहानपणीच लाभल्याने नामदेवांना थोडी “ग”ची बाधा झाली होती.. तेव्हा मुक्ताईने सांगितले.. बाकी सारे ठीक.. पण मडके जरा कच्चे आहे.. आणि विसोबा खेचरांनी ज्ञानदेवांच्या सांगण्यावरून नामदेवांचा शिष्य म्हणून स्वीकार केला..

नामदेवांनी कोणत्याही मोठ्या ग्रंथाची रचना केलेली नाही.. पण त्यांनी निरलस भक्ती भावात ओथंबलेल्या अनेक अभंग आणि काव्याची रचना केली आहे. ज्ञानियाच्या प्रेरणेने ते संपूर्ण हिंदुस्थानभर भागवत धर्माची पताका घेऊन फिरले.. ते पंजाबी, राजस्थानी, हिंदी भाषा शिकले.. महाराष्ट्रातून निघाल्यावर ते थेट दक्षिणेस म्हैसूर , तामिळनाडू, रामेश्वरपर्यंत गेले. त्यानंतर उत्तरेकडे गेले. पुढे गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, फिरून येऊन ते शेवटची वीस वर्षे प्रदीर्घ काल पंजाबात राहिले. प्रत्येक प्रांतातील भाषा त्यांनी आत्मसात करून त्याचा वापर त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी केला.. लोक जागृतीसाठी केला.. १२१८ च्या सुमारास ते दक्षिणेत गेले.. तेव्हा अनेक अल्पसंख्यांक समूह स्वत:स नामदेव म्हणवू लागले.. आजही चेन्नईतील भूसागर, मल्ला या ज्ञाती स्वत:ला अभिमानाने नामदेवांचे अनुयायी म्हणवून घेतात.

बारावे शतक.. ज्ञानदेव ..मुक्ताई.. जनाई.. नामदेव.. या साऱ्या संत परंपरेचा वासंतिक बहराचा कालखंड असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये. बाराव्या शतकातील यादवकालीन संपन्न.. समृद्ध महाराष्ट्राला भक्तिमार्गावर आणणारी ही संत परंपरा.. स्वत: विठूराया या मांदियाळीत सामील होऊन ताल धरत असे.. नाचत असे.. प्रत्येक संत म्हणजे स्वत:तच एक विद्यापीठ.. त्यांच्या ज्ञानाचा ठेवा सर्वांसाठी खुला.. फक्त तो टिपण्याची समाज आणि जान हवी.. नामदेवबाबांचे कार्य तर फार मोठे.. आपल्या लडिवाळ भक्तीने खुद्द देवालाही त्यांनी मोहात पाडले.. राजस्थानात असलेली त्यांची लहान मोठी मिळून १५०च्या वर सार्वजनिक मंदिरे नामदेवांच्या कार्याची साक्ष देत आहेत.. मीराबाईंच्या अभंगातही नामदेवांचा भावपूर्ण उल्लेख आढळतो.. संपूर्ण आयुष्यभर पदयात्रा करत भागवत धर्माची ही प्रचार पताका पंढरपुरात आपल्या अराध्याच्या पायरीशी स्थिरावली.. विसावली..