स्टरलाईट गेला, नाणारही जाणार!

124

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

२५ वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये स्टरलाईटचा प्रकल्प येऊ घातला होता. या प्रदूषणकारी प्रकल्पाच्या विरोधात संपूर्ण जिल्हा तेव्हा एकवटला होता. जनता रस्त्यावर उतरली आणि हा प्रकल्प रद्द करायला भाग पाडले. तोच स्टरलाईट प्रकल्प तामिळनाडूतील तुतिकोरीन या ठिकाणी सुरू झाला. तिथंही प्रदूषणाने त्रस्त झालेल्या जनतेने विरोध केला. तामिळनाडूत झालेल्या आंदोलनात १३ जणांचा मृत्यू झाला. आंदोलनानंतर तामिळनाडू सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याच दरम्यान नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात असलेला लढाही पेटलाय. स्टरलाईटसारखेच आंदोलन नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात कोकणात उभे राहील, असा विश्वास व्यक्त करणारा स्टरलाईटविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. केतन घाग यांचा हा विशेष लेख.

स्टरलाईटच्या विरोधात आम्ही जेव्हा लढा उभा केला त्या वेळी माझी ‘स्टरलाईट हटाव, रत्नागिरी बचाव संघर्ष’ समितीच्या अध्यक्षपदी तशी अनपेक्षित निवड झाली. पहिल्या बैठकीपासूनच आम्ही राजकारण विरहित समिती चालवायची हे निश्चित केले होते. राजकीय पक्षाची काही मंडळी समितीत असली तरी त्यांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा दबाव समितीवर येत नव्हता.

आमिषांना बळी पडलो नाही

अनिल अग्रवाल नावाचा एक इसम ज्याने आम्हाला एक ऑफर दिली की तुम्हाला जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी  असे प्रकल्प आहेत, त्या त्या ठिकाणी मी घेऊन जातो,  असे सांगितले. पण त्याच वेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्ही आमचा पासपोर्ट काढाल, व्हिसा काढाल. आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला घालाल, राहायला द्याल. पण तुमचा समज असेल की ही मज्जा उपभोगून आमचा विचार बदलेल तर ते शक्य होणार नाही. असे सांगून आम्ही ती ऑफर धुडकावली आणि आमच्या लढय़ावर लक्ष केंद्रित केलं. खरं तर मी जग फिरलो नाही, पण पुस्तकातून जग अनुभवलं. आम्हाला त्यातूनच प्रकल्पाविषयीची माहिती मांडता येत होती.

‘बीबीसी’ने विरोध आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला

डिसेंबर १९९३ महिन्यामध्ये आम्ही एक महामोर्चा काढला. प्रकल्पाच्या विरोधात जिल्हाभरातून लाखो लोक रस्त्यावर उतरले. हा मोर्चा प्रकल्पस्थळावर जाण्यासाठी तीन चार तासांचा अवधी गेला. स्टरलाईट कंपनीला झालेल्या विरोधाची दखल त्या वेळी बीबीसी या वृत्तवाहिनीने घेतली आणि आमचा विरोध आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचताच सरकारला जाग आली.

शरद पवार यांचेही समितीसमोर काही चालले नाही

३१ डिसेंबर १९९३ ला मुख्यमंत्री शरद पवार रत्नागिरीत आले. त्यांनी संघर्ष समितीसोबत चर्चा करण्याचे जाहीर केले. ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही सर्वजण शरद पवार यांची वाट पाहात होतो. शरद पवार दीड तास उशिराने आले. आम्ही त्यांची वाट पाहून कंटाळलो तेव्हा आमची चुळबुळ सुरू झाली. कशाला एवढी वाट पाहायची, पण लोकांनीच धीर धरण्याच्या सूचना केल्या. मीही थांबलो. मुख्यमंत्री शरद पवार चर्चेसाठी आमच्या समोर येऊन बसले. मी सुरुवातीलाच सांगितले की, मला काही प्रश्न विचारायचे आहेत. उत्तरे मिळाली तरच पुढील चर्चा करू. मला प्रश्न विचारण्याची मुभा मिळाली. मी मुख्यमंत्री शरद पवार यांना उद्देशून विचारलं, साहेब, तुम्ही २७ आणि २८ तारखेला स्टरलाईट कंपनीला प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱया सर्व परवानग्या देऊन टाकलात. मग आता इथे कसली चर्चा होणार. आधी त्या सर्व परवानग्या रद्द करा, मगच पुढे चर्चा करा. त्यामुळे त्या बैठकीत तसं फारसं काही निष्पन्न झालं नाही. पण मुख्यमंत्री शरद पवार यांना रत्नागिरीतील काही काँग्रेसच्या मंडळींनी आधीच कल्पना दिली होती की समितीतील लोक कोणी ऐकणार नाहीत. हे लोक प्रकल्प होऊ देणार नाहीत याची कल्पना मुख्यमंत्री शरद पवार यांना आली होती. त्यामुळेच त्यांनी मुंबईत गेल्यानंतर काही दिवसांनी हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली.

गंजलेल्या यंत्रांच्या खपल्या गोळा केल्या

स्टरलाईटच्या विरोधात आंदोलन सुरू असताना ते चिरडण्यासाठी प्रकल्पाचे कामही सुरू झाले होते. प्रकल्पासाठीची यंत्रे बाहेरून आणली जात होती. या यंत्राच्या खपल्या रस्त्यावर पडायच्या. इतकी ही गंजलेली यंत्रणा होती. या खपल्या आम्ही एकत्र केल्या होत्या त्या मुख्यमंत्री शरद पवार यांना दाखवण्यासाठीच. इतकी भंगार यंत्रणा आणून तुम्ही हा प्रकल्प करणार का, असा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा होता. प्रकल्पाचे काम सुरू असताना संतापलेल्या लोकांनी तिथल्या अधिकाऱयांना मारझोडही केली. त्यांचे जेवण बंद केलं. प्रत्येक जण विरोध करत होता आणि हा विरोध पक्षविरहित असल्यामुळेच आम्हाला यश मिळालं. देशामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की एक संघर्ष समिती उभी राहतेय आणि पक्षविरहित लोकं काम करतात. पक्षीय मंडळी समितीत असूनही पक्षाचे राजकारण आणत नाहीत ही एक आदर्शच घटना होती.

डॉ. रश्मी मयूर या पर्यावरणवादी तज्ञाने आम्हाला खूप मदत केली. ते मुंबईहून रत्नागिरीत येत आणि आम्हाला प्रकल्पाच्या विषयी आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम याची माहिती देत. त्यांच्या माहिती आणि मार्गदर्शनामुळे आमचा लढा अधिक प्रबळ झाला.

हरित लवादासमोर विरोध मांडावा!

राजापूरवासीय प्रकल्पाला विरोध करत असेल तर त्यांनी प्रकल्पाबाबतची शास्त्रशुध्द माहिती मिळवली पाहिजे. पेट्रोकेमिकल रिफायनरीबाबत माहिती असलेल्या तज्ञ मंडळींची भेट घेऊन या रिफायनरीचे पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतील, हे समजावून घेतले पाहिजे. शास्त्रशुध्द माहिती मिळवूनच पुढे प्रकल्पाच्या विरोधात लढा पुकारला पाहिजे. पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या विरोधात लढणाऱया ग्रामस्थांनी नवी दिल्लीतील हरित लवादापुढे जाऊन विरोध मांडावा. त्यांना निश्चितच न्याय मिळेल, असे घाग म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या