होळी खेळताना आपल्या मित्रांची काळजी घ्या!

85

योगेश नगरदेवळेकर

रंग खेळताना स्वतःचे भान नसते तर मग आपण आपल्या आसपास असणाऱया पाळीव आणि इतर पशुपक्ष्यांकडे तरी कसे लक्ष देणार! आपली रंगपंचमी इतर जीवांना फारच महागात पडते.

 माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. प्रत्येक सण साजरा करायला माणसाला फार आवडते. मग तो गणपती असो, दिवाळी किंवा होळी रंगपंचमी, प्रत्येक सणाची एक आगळीच मजा असते. गणपतीच्या आरत्या, दिवाळीचे फटाके आणि रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघणे.

पूर्वीच्या काळी रंगपंचमी नैसर्गिक रंगाने खेळली जायची. हळदीचा पिवळाधमक, पळसाच्या फुलांचा लाल रंग असे रंग वापरले जात. सणांचे स्वरूप बदलत बदलत आता ते पूर्णपणे कमर्शियल होत चालले आहे. एवढा रंग निसर्गातून कसा मिळणार. मग कृत्रिम रंग, जे कपडय़ाच्या रंगवण्याच्या प्रक्रियेत वापरले जातात. ते वापरायला सुरुवात झाली. केमिकल रंग म्हटले की त्याबरोबर त्याचे दुष्परिणामही ओघाने आलेच की.

रंग खेळताना स्वतःचे भान नसते तर मग आपण आपल्या आसपास असणाऱया पाळीव आणि इतर पशुपक्ष्यांकडे तरी कसे लक्ष देणार! आपली रंगपंचमी इतर जीवांना फारच महागात पडते.

होळीमुळे होणाऱया वेगवेगळय़ा प्रदूषणाला हे मुके जीव बळी पडतात. जेवढा रंग झळाळता तेवढा तो जास्त धोकादायक असतो. हवेत उधळला जाणारा गुलाल किंवा रंग आपल्याला वाटतो की विरून गेला, पण त्याचे सूक्ष्म कण हवेत पसरत राहतात आणि प्राणी आणि पक्ष्यांच्या श्वसनामार्फत त्यांच्या शरीरात जातात.

माणसाच्या दृष्टीने श्वासात जाणाऱया सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी असेल, पण एखाद्या चिमणीला किंवा साळुंकीला हा डोस मृत्यूकडे नेतो. रंग चकाकते बनवण्यासाठी त्यात वेगवेगळय़ा प्रकारचे मिनरल्स मिसळले जातात. ही सर्व प्राण्यांकरिता. अगदी मनुष्यप्राणी पण त्यात आला.

होळीची गंमत म्हणून कुत्र्याला किंवा मांजरांना रंग लावला जातो. हे तर त्यांच्या दृष्टीने अतिशय वाईट असते. प्राण्याच्या त्वचेतील रंध्रांमधून हे द्रव्य आत उतरतात आणि त्यांना खाज येणे, केस गळून जाणे किंवा हेच विषारी द्रव्य रक्तात मिसळून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते.

अंग चाटणे ही प्राण्यांची सहजप्रवृत्ती असते. अंगाला लागलेला रंग ते चाटून काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारात ते विष सरळ त्यांच्या पोटात जाते आणि मग त्यांच्या अन्नपचनाच्या प्रक्रियेवर थेट परिणाम होतो. परिणामी तो प्राणी आजारी पडतो. अंगाला लागलेल्या रंगामुळे जळजळ होत असल्यास असे प्राणी चिडचिडे होतात आणि मनुष्याला चावू लागतात.

कोणत्याही प्राण्याच्या अंगावर रंग लागल्यास त्याला रॉकेल किंवा थिनरने साफ करण्याचा प्रयत्न करू नये. याचा त्यांना त्रास होऊ शकतो. प्राण्यांसाठी असलेल्या शॅम्पूने रंग काढण्याचा प्रयत्न करावा. रंग खेळताना बाहेरील पाणीसुद्धा रंग मिसळले गेल्याने प्रदूषित होते. तहान लागलेल्या प्राण्याने हे पाणी प्यायल्यास त्यांना त्याचा त्रास होतो. या प्राण्यांसाठी तसेच पक्ष्यांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध केले पाहिजे.

सण साजरा करताना भोवतालच्या सजीव सृष्टीची काळजी आपणच घ्यायची आहे ना. म्हणून रंग खेळा पण या प्राण्यांकडेही लक्ष ठेवा.

 

आपली प्रतिक्रिया द्या