शक्ती, करिश्माची जोडी घेतेय थंडाव्याचा आनंद; वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात विशेष काळजी

 

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शक्ती आणि करिश्मा ही वाघाची जोडीही थंडाव्यासाठी कृत्रिम तलावात डुबकी मारत गारव्याचा आनंद घेत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असून त्याला वन्यपशूपक्षीही अपवाद नाहीत. मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पशुपक्ष्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. विविध जातीच्या शेकडो झाडांमुळे आधीच गारवा असलेल्या उद्यानात शक्ती आणि करिश्मा ही जोडी आणि तिच्या वीरा या छाव्याचीही विशेष काळजी घेतली जात आहे.

ही जोडी उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत असून काही वेळा त्यांना अन्नाबरोबर बर्फाची थंडगार लादीही दिली जात आहे. पक्ष्यांसाठी विशेष पाणवटे तयार केले गेले असल्यामुळे उन्हापासून त्यांचे संरक्षण होत आहे.